Sun, Mar 24, 2019 08:31होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज व्यापक बैठक

सकल मराठा समाजाची आज व्यापक बैठक

Published On: Aug 22 2018 12:56AM | Last Updated: Aug 22 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असणार्‍या राज्यव्यापी जनआंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे दि. 22 ऑगस्ट रोजी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी 5 यावेळेत मुस्कान लॉन, शाहू मार्केट यार्ड  येथे ही  बैठक होणार आहे. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. मूक मोर्चानंतर ठोक ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ऑगस्ट क्रांतिदिनी झालेल्या प्रचंड आंदोलनानंतर ठिय्या आंदोलनाची धार सातत्याने वाढतच आहे. दसरा चौकातील मुख्य आंदोलनाबरोबरच शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी विविध प्रकारचे आंदोलन सुरूच आहे. सरकारकडून आंदोलनात फूट पाडण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आंदोलन विस्कळीत न होता एकजुटीने आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू राहावा, यासाठी पुढील दिशा ठरविण्याच्या उद्देशाने बैठक होणार आहे. 

बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह शहरातील प्रतिनिधी-समन्वयक आपली मते मांडणार असून त्यावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. दुपारी 3 ते 5 यावेळेत पश्‍चिम महाराष्ट्रातील समन्वयकांची बैठक होईल. यात सोलापूर, पंढरपूर, मिरज, सांगली, सातारा, कराड, पुणे, मुंबई येथील प्रतिनिधी सहभागी असणार आहेत. बैठकीत सकल मराठा समाजाच्या सरकारकडे मागण्या, आरक्षणा व्यतिरिक्त इतर मागण्यांसह शैक्षणिक विषय आणि आंदोलनाची राज्यस्तरीय आचार संहिता ठरविणे याबाबत चर्चा होणार आहे. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रमुख प्रतिनिधींसह सकल मराठा समाज संस्था-संघटनांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.