Tue, Mar 26, 2019 11:42होमपेज › Kolhapur › फासावर चढायचं नाही... लढायचं...

फासावर चढायचं नाही... लढायचं...

Published On: Jul 31 2018 1:31AM | Last Updated: Jul 31 2018 12:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी औरंगाबाद येथील युवक प्रमोद पाटील याने सोमवारी रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या केली. त्याला श्रद्धांजली वाहून कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने सकल मराठा क्रांती संघटनेच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला. इतकेच नव्हे, ‘आता आपण फासावर चढायचे नाही, तर न्याय्य मागण्यांसाठी सरकारलाच फासावर चढवायचं. आपण रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या करायची नाही, तर लढून हक्क मिळवायचा’, असे आवाहन करत प्रतीकात्मक फाशी घेणार्‍या आंदोलक कार्यकर्त्यांना रोखले.

सोमवारी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकातील मराठा आरक्षण ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. काळा-पांढरा पोशाख, डोक्यावर ‘एक मराठा, लाख मराठा’ लिहिलेली टोपी, हातात व गळ्यात मराठा आरक्षणाबाबतचे फलक घेऊन बार असो.चे पदाधिकारी यांनी आपले कामकाज बंद ठेवून दसरा चौकात ठिय्या मांडला. दिवसभर वकील ठिय्या आंदोलनास उपस्थित होते. यामुळे न्यायालय व बार असोसिएशनच्या परिसरात शुकशुकाट होता. 

बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, उपाध्यक्ष अ‍ॅड. आनंदा जाधव, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे,  अ‍ॅड. धनंजय पाठाडे, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. राजेंद्र किंकर, अ‍ॅड. ए. ए. कापसे, अ‍ॅड. सुशांत गुडाळकर, अ‍ॅड. तेहजीज नदाफ, अ‍ॅड. धैर्यशील पवार, अ‍ॅड. मनीषा पाटील, अ‍ॅड. जयदीप कदम, अ‍ॅड. ओंकार देशपांडे, अ‍ॅड. अविनाश पाटील, अ‍ॅड. स्वाती तानवडे, अ‍ॅड. संजय मुळीक, अ‍ॅड. युवराज शेळके, अ‍ॅड. अभिषेक देवरे, अ‍ॅड. दिलीप पोवार, अ‍ॅड. अमोल नाईक, अ‍ॅड. सचिन आवळे, अ‍ॅड. चारुलता चव्हाण, अ‍ॅड. प्रकाश आंबेकर, अ‍ॅड. विलास दळवी, अ‍ॅड. के. के. सासवडे, अ‍ॅड. शिवराम जोशी, अ‍ॅड. मनीषा रोटे, अ‍ॅड. धैर्यशील मिसाळ यांच्यासह बार असोसिएशनचे सर्व सदस्य वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कायदेशीर बाबींसाठी मोफत सेवा...
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या लढ्यातील कायदेशीर बाबींसाठी मोफत सेवा बार असोसिएशनकडून पुरविण्यात येईल, अशी घोषणा अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी केली. मुंबई, दिल्ली येथील न्यायालयातील तज्ज्ञांशी चर्चा करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली. 

मराठा आरक्षण हीच शेवटची इच्छा...
दसरा चौकातील आंदोलनस्थळी प्रतीकात्मक फाशीचा देखावा उभारण्यात आला. सकल मराठा आरक्षण क्रांती संघटनेचे पदाधिकारी दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे यांच्या तोंडावर काळ्या रंगाचे बुरखे घालून गळ्यात फासाचे दोर गुंडाळून हात बांधलेल्या अवस्थेत त्यांना दसरा चौकातून फिरविण्यात आले. यानंतर फास लावण्यापूर्वी त्यांना, ‘तुमची शेवटची इच्छा काय?’ असे विचारण्यात आले. 

यावर सर्वांनी, ‘आमची शेवटची इच्छा मराठा आरक्षण... मराठा आरक्षण... मराठा आरक्षण,’ असे त्रिवार ठणकावून सांगितले. दरम्यान, आंदोलनस्थळी आलेल्या बार असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना फास घेण्यापासून रोखत तुम्हाला फासावर जायची गरज नाही. न्याय मागणीसाठी प्रसंगी सरकारला फासावर चढवा,’ असे सांगत आंदोलनकर्त्यांच्या गळ्यातील फासाच्या दोर्‍या काढून तोंडावरील काळे बुरखे काढले. यामुळे उपस्थितांनी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे...’ यासह विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. 

मागासवर्गीय आयोगाला सहकार्य मिळत नाही
मराठा आरक्षणासाठी कार्यरत असणार्‍या मागासवर्गीय आयोगाला राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचा आरोप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला सरचिटणीस अ‍ॅड. मनीषा रोटे यांनी केला. मराठा आरक्षणासाठी आवश्यक बाबींचा अभ्यास करण्यासाठी मागासवर्गीय आयोग सक्रिय आहे. मात्र, त्यांना आवश्यक कार्यालयीन सुविधा, कागदपत्रे, कर्मचारी उपलब्धता, ऐनवेळी-अचानक लागणार्‍या गोष्टींसाठी होणारा खर्च, अशा गोष्टींची उपलब्धता राज्य शासनाकडून केली जात नसल्याचे अ‍ॅड. रोटे यांनी सांगितले. खोटी आमिषे दाखवून मराठा समाजाच्या भावनांशी खेळ करू नका, असे आवाहन त्यांनी दसरा चौकातील आंदोलनात केले. 

लहानग्या कुणालचा सवाल...
आंदोलनस्थळी दिंडनेर्ली  (ता. करवीर) येथील इयत्ता तिसरीत शिकणारा कुणाल कोईंगडे याने मराठा आरक्षण या विषयावरील आपल्या भावना ओघवत्या शैलीतून व्यक्त केल्या. खड्या आवाजात भाषण करून त्याने उपस्थितांची मने जिंकली. शिवछत्रपती, रणरागिणी ताराराणी, लोकराजा राजर्षी शाहू यांनी रयतेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचे दाखले देऊन राज्य शासनाकडून सुरू असणार्‍या अन्यायावर भाष्य केले. ‘आरक्षण आमच्या हक्काचे...’ असे त्याने ठणकावून सांगितले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक करत त्याला पाठिंबा दिला.

शासन झोपेचं सोंग घेतंय : आवळे 
माजी मंत्री जयवंतराव आवळे म्हणाले, अनेक वर्षं मराठा समाजाने सनदशीर मार्गाने आंदोलने केली. मूक मोर्चाने तर जगाचे लक्ष वेधून घेतले. मराठा आरक्षणाचा निर्णय शासनाने त्वरित जाहीर करावा; पण शासन झोपेचं सोंग घेत आहे. झोपलेल्यांना जागं करणं सोपं आहे; पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करणं अवघड आहे. सरकारनं गुळगुळीत आणि मुळमुळीत बोलून फसवायचं काम केलं आहे. सर्व जाती-धर्मांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करा. नुसतं बोलण्यात वेळ घालवू नका. तरुणांचा संयम सुटत चाललाय, असेही त्यांनी सांगितले.