Wed, Jul 17, 2019 08:32होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : महाराष्‍ट्र बंदमुळे शाळा परिसरात शुकशुकाट

कोल्‍हापूर : महाराष्‍ट्र बंदमुळे शाळा परिसरात शुकशुकाट

Published On: Jul 24 2018 1:36PM | Last Updated: Jul 24 2018 2:07PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (दि.24) शहरातील मराठीसह इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद राहिल्याने शाळा परिसरात शुकशुकाट होता. 

औरंगाबादमध्ये मराठा आरक्षण प्रश्‍नाबाबत आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी नदीत उडी घेतली. वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. मराठा संघटनांनी याबाबत मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सोशल मीडियावरही सोमवारी रात्री उशिरापासून महाराष्ट्र बंदचे मेसेज व्हायरल झाले होते. 

वाचा : ...तर काकासाहेबचे प्राण वाचले असते !

शहरात सकाळच्या सत्रात बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळा असतात. महाराष्ट्र बंद असल्याने पालक मुलांना शाळेत सोडायचे की नाही याबाबत संभ्रमात होते. अनेक पालकांनी शाळेशी संपर्क साधून खात्री केली. काही पालक विद्यार्थांना सोडण्यासाठी शाळेत गेले. मात्र, महाराष्ट्र बंद असल्याने एक दिवसाठी शाळा बंद ठेवण्यात आल्याचे फलक लागल्याचे दिसल्याने परत जावे लागले. रिक्षावाल्या मामांनीही शाळा बंदची माहिती पालकांना फोनवरुन दिली.

सकाळी अकरा वाजता मराठी माध्यमांच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा भरतात. नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेत गेले, परंतु शाळेला सुट्टी असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या शाळा सुरु राहिल्या. पण पालकांनी दक्षता म्हणून मुलांना शाळेत पाठविले नसल्याने विद्यार्थी संख्या तुरळक होती. शाळा सुरु पण विद्यार्थी नसल्याने बंदची परिस्थिती बहुतांश ठिकाणी पहायला मिळाली. शाळा बंदमुळे विद्यार्थांना सलग तीन दिवस सुट्टीचा आनंद घेता आला.