Tue, Jul 16, 2019 22:30होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत दगडफेकीने तणाव

इचलकरंजीत दगडफेकीने तणाव

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 12:41AMइचलकरंजी : वार्ताहर

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला इचलकरंजीसह परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यवहार कडकडीत बंद होते. इचलकरंजी शहरातील व्यवहार दिवसभर कडकडीत बंद होते. त्यामुळे प्रमुख चौकांमध्ये शुकशुकाट जाणवत होता.  बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दरम्यान, आंदोलकांनी टायर फेटवून रास्ता रोको केला.

बंददरम्यान जवाहरनगर येथील दारू दुकानावर दगडफेक करण्यात आली. यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना सोडण्यात यावे, अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

सकाळपासूनच युवक रॅली काढून बंदचे आवाहन करीत होते. काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रकार घडले. जवाहरनगर येथील एका दारू दुकानावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दगडफेक केल्याप्रकरणी दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. या कार्यकर्त्यांना तातडीने सोडावे, अशी मागणी करीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोठ्या संख्येने जमाव जमला. दोघा कार्यकर्त्यांना सोडल्याशिवाय शिंदे यांना श्रद्धांजली वाहणार नाही, अशी भूमिका घेत यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक इरगोंडा पाटील यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी केली. पाटील यांनी याबाबत निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलकांनी शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली. बंदच्या अनुषंगाने शहरातील एसटी बस वाहतूकही बंद होती. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुकशुकाट पसरला होता. बस बंद असल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल झाले. 

कबनुरात मोटारसायकल रॅली

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, कोपर्डी घटनेतील पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी कबनुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी 9 वाजता मराठा समाजबांधव व युवक वर्ग मोठ्या संख्येने मराठा समाज भवन येथे जमा झाला. तेथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी गावातील दुकानदार, व्यावसायिक यांना बंदचे आवाहन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच गावातील शाळांनीही सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे मुख्य चौकासह अन्य भागांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. रॅली चौकात आल्यानंतर राष्ट्रवादीचे सुनील इंगवले यांनी प्रास्ताविक केले. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंदचे आयोजन केले होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे सुरेश पाटील, माजी नगरसेवक दिलीप झोळ, उपसरपंच प्रदीप मणेरे, ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष महावीर लिगाडे उपस्थित होते.

कुंभोजमध्ये निषेध फेरी

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज, हिंगणगाव, दुर्गेवाडी, नेज-शिवपुरी, बाहुबली, नरंदे परिसरात मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद पाळण्यात आला. कुंभोजमधील शिवसेना, युवा सेना व सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.