Wed, Apr 24, 2019 07:38होमपेज › Kolhapur › आरक्षणासाठी मुंडन

आरक्षणासाठी मुंडन

Published On: Jul 28 2018 1:33AM | Last Updated: Jul 27 2018 11:39PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनात मराठा कार्यकर्त्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारीही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याच्या विविध भागातील पक्ष, संघटना, राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आंदोलनात सहभागी मराठा तरुणांनी मुंडन करून आपला निषेध नोंदवला. 

कसबा बावडा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढून या आंदोलनाला पाठिंबा दिला. यात सहभागी कार्यकर्त्यांनी सुरुवातीला शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर व्यासपीठावर सरकारच्या नावे शंखध्वनीही करण्यात आला. त्यात आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह सर्वच सहभागी झाले. शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्यातून मराठ्यांचा जागर केला. 

याशिवाय माजी आमदार मालोजीराजे, उपमहापौर महेश सावंत, करवीर पंचायत समितीचे सभापती राजू सूर्यवंशी व त्यांचे सर्व सदस्य, दक्षिण भारत जैन समाज, वाघाची तालीम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, बालगोपाल तालीम मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संदीप खवरे, श्रीपती रायकर, जिजाऊ ब्रिगेडच्या डॉ. जयश्री चव्हाण, रंजना पाटील, अलका भोईटे, सुवर्णलता गोवीलकर, आयेशा खान, सारिका पाटील, जयश्री जाधव, वैशाली जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजू आवळे, भुदरगडचे कल्याणराव निकम, हणबरवाडीचे सरपंच धनाजी खोत, युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष दीपक थोरात, उपाध्यक्ष विष्णू पाटील, वाचनकट्टाचे युवराज कदम आदिंनी ठिय्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. 

सरकारकडून चालढकल : मालोजीराजे

आरक्षणाचा निर्णय तातडीने सरकारने घ्यावा. अजूनही वेळ गेलेली नाही. शासनाने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आरक्षणाचे वचन सरकारने दिले होते; पण ते पाळले नाही. न्यायालयाचे कारण सांगून सरकार चालढकल करत आहे; पण मराठा समाजाच्यातील तरुणांचा संयम आता सुटत आहे. 1902 मध्ये शाहू महाराजांनी आरक्षण देताना त्यात मराठ्यांनाही दिले होते, असे 
माजी आमदार मालोजीराजे यावेळी म्हणाले. 

अन्यथा आत्मदहन : मधुकर पाटील

शासनाच्या मेगा भरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले पाहिजे. हे आरक्षण न देता ही भरती झाली तर आत्मदन करू, असा इशारा यावेळी  मधुकर पाटील यांनी दिला.