Tue, Mar 26, 2019 11:40होमपेज › Kolhapur ›  हातकणंगलेत  पाच एस.टी. बसवर  दगडफेक

 हातकणंगलेत  पाच एस.टी. बसवर  दगडफेक

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 12:37AMहातकणंगले : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानानंतर आज हातकणंगले येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगली -कोल्हापूर रस्त्यावर टायरी पेटवून चक्काजाम करण्यात आला. यावेळी इचलकरंजी -पेठवडगाव व  सांगली - कोल्हापूरकडे जाणार्‍या पाच एस.टी. बसेसवर संतप्त युवकांनी तुफान दगडफेक केली. यामध्ये बसेसचे प्रचंड नुकसान झाले आहे. बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मंगळवारचा आठवडा बाजार आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील सर्व व्यवहार बंद होते. मिणचे येथील शिवसैनिकांनी गाव बंद ठेवून आंदोलन केले. 

काकासाहेब शिंदे या युवकाने मराठा आरक्षणासाठी नदीत उडी मारून जलसमाधी घेतली होती. त्याला श्रद्धांजली वाहून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली. हातकणंगले येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगली-कोल्हापूर रस्त्यावर 15 मिनिटे चक्काजाम करण्यात आला. आक्रमक झालेल्या तरुणांनी काही बसेसवर दगडफेक केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर इचलकरंजी डेपोने सर्व बसेस थांबण्याचा निर्णय घेतला. गडहिंग्लज विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व जयसिंगपूर उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे व हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक एस. एल. डूबल यांनी आंदोलकांशी चर्चा करून वाहतुकीस मार्ग मोकळा केला.