Fri, Aug 23, 2019 14:35होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणप्रश्‍नी बुधवारी व्यापक बैठक

मराठा आरक्षणप्रश्‍नी बुधवारी व्यापक बैठक

Published On: Aug 20 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 1:06AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे ऐतिहासिक दसरा चौकात आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाच्या साक्षीने गेली 25 दिवस ठोक ठिय्या आंदोलन सुरू आहे. याला  सर्व जाती-धर्मीयांचा पाठिंबा मिळत आहे. भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 22) सकाळी साडेदहा ते सायंकाळी 5 यावेळेत मुस्कान लॉन, शाहू मार्केट यार्ड  येथे ही  बैठक होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. मूक मोर्चानंतर ठोक ठिय्या आंदोलन सुरू आहे. ऑगस्ट क्रांतिदिनी झालेल्या प्रचंड आंदोलनानंतर ठिय्या आंदोलनाची धार सातत्याने वाढतच आहे. दसरा चौकातील मुख्य आंदोलनाबरोबरच शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी विविध प्रकारचे आंदोलन सुरूच आहे. सरकारकडून आंदोलनात फोडण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आंदोलन विस्कळीत न होता एकजुटीने आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू रहावा यासाठी पुढील दिशा ठरविण्याच्या उद्देशाने बैठक होणार आहे. 

बैठकीत सर्व तालुक्यांसह शहरातील प्रतिनिधी-समन्वयक मते मांडणार असून त्यावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. दुपारी 3 ते 5 यावेळेत पश्‍चिम महाराष्ट्रातील समन्वयकांची बैठक होईल. यात सोलापूर, पंढरपूर, मिरज, सांगली, सातारा, कराड, पुणे, मुंबई येथील प्रतिनिधी सहभागी असणार आहेत. बैठकीत सकल मराठा समाजाच्या  सरकारकडे मागण्या, आरक्षणाव्यतिरिक्त इतर मागण्यांसह शैक्षणिक विषय आणि आंदोलनाची राज्यस्तरीय आचारसंहिता ठरविणे याबाबत चर्चा होणार आहे. पत्रकार परिषदेस दिलीप देसाई, वसंत मुळीक, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, गणी आजरेकर, किशोर घाटगे, अवधूत पाटील, उमेश पोवार, संजय पोवार-वाईकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.