Wed, Mar 27, 2019 03:56होमपेज › Kolhapur › रास्ता रोको, रॅलीने आरक्षणासाठी एल्गार

रास्ता रोको, रॅलीने आरक्षणासाठी एल्गार

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 12:44AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी  पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गांधीनगर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. अनेक मार्गांवरील वाहतूक बंद राहिल्याने याचा नागरिकांना फटका बसला. काही ठिकाणी रस्त्यावर टायर पेटवून देऊन रास्ता रोको करण्यात आला.  इचलकरंजी येथे दारू दुकानावर केलेल्या दगडफेकीनंतर तणाव निर्माण झाला. सर्वच तालुक्यात तरुणांनी रॅली काढून बंदमध्ये सहभाग घेतला.
या बंदचा सर्वात जास्त फटका कागल, गारगोटी आणि कुरुंदवाड या आगारांना बसला. मुदाळ तिट्टा येथे कार्यकर्त्यांनी रास्तो रोको आंदोलन केले. त्यामुळे गारगोटीहून कोल्हापूर, राधानगरी, निपाणी या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. कुरुंदवाड, जयसिंगपूर, हातकणंगले या ठिकाणी एसटीच्या बसेसवर दगडफेक झाल्याने कुरुंदवाडमधून सोडण्यात  येणार्‍या बसेस बंद ठेवण्यात आल्या. कागल आगाराच्याही गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या, या शिवाय दिवसभरात जिल्ह्यातील काही आगारांत थोड्या उशिरा गाड्या सोडण्यात येत होत्या. काही मार्गांवर तणावाची स्थिती असल्यामुळेही एसटीच्या फेर्‍या रद्द कराव्या लागल्या, असे एसटीच्या वतीने सांगण्यात आले. 

गांधीनगरसह परिसरात कडकडीत बंद

गांधीनगर ः वार्ताहर

मराठा क्रांती मोर्चाच्या आवाहनानुसार महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत संपूर्ण गांधीनगर बाजारपेठ, गडमुडशिंगी, वळिवडे, चिंचवाड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.  तावडे हॉटेलपासून चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंतची सर्व गांधीनगर बाजारपेठ बंद राहिली. गुरुनानक मार्केट, झुलेलाल मार्केट,  स्वस्तिक मार्केट, शिवाजी मार्केट, सिंधू मार्केट, स्वामी टेऊँराम मार्केट, लोहिया मार्केट आदी सर्व मार्केट बंद राहिली. सिंधी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदला  पाठिंबा दिला. 

दरम्यान, गडमुडशिंगीमधील सर्व व्यवहार बंद राहिले. स्वागत कमानीपासून शेवट बस स्टॉपपर्यंतची सर्व दुकाने बंद राहिली. वळिवडेतही सर्व दुकाने बंद राहिली. सरपंच अनिल पंढरे यांनी सकल मराठा समाजाची बैठक घेऊन शासनाने मराठा आरक्षण प्रश्‍नी त्वरित निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी केली. त्याला बैठकीत पाठिंबा व्यक्त करण्यात आला. चिंचवाडमध्येही बंदला प्रतिसाद  मिळाला. कोठेही अनुचित प्रकार न होता बंद शांततेत झाला.

भुयेत रस्त्यावर टाकले दगड 
शिये : वार्ताहर 

महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर भुये  (ता. करवीर) येथे पडसाद उमटले.  मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास गनिमी काव्याने रत्नागिरी-सोलापूर या प्रस्तावित महामार्गावर  दगड टाकून व टायर पेटवून राज्यमार्ग (क्रमांक  194) रोखण्यात आला.  

रस्ता रोखल्याची माहिती  एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली.  तोपर्यंत आंदोलक पसार झाले होते.  यावेळी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे भुये ग्रामस्थांना अवाहन केले. रस्ता मोकळा करण्यासाठी पेटलेल्या टायर व दगड धोंडे बाजूला केले व वाहतूक सुरळीत चालू केली.

गोकुळ शिरगाव परिसरात बंद

उजळाईवाडी : प्रतिनिधी
मराठा क्रांती मोर्चातर्फे बंदच्या आवाहनाला गोकुळ शिरगाव परिसरात सर्व दुकाने बंद ठेवून चांगला प्रतिसाद मिळाला.गोकुळ शिरगाव एम.आय.डी.सी. फाटा परिसरातील सर्व मराठा बांधव एकत्र येऊन सर्व व्यापार्‍यांना आपली दुकाने बंद करायला लावून हा बंद शांततेत पार पडला. यावेळी केएमटी बसेस गोकुळ शिरगावपर्यंतच धावत होत्या. तसेच महामार्गावर वाहतूक ही तुरळक होती.यावेळी शिवसेना करवीर तालुका प्रमुख विनोद खोत, विलास पाटील, शिवाजी मगदूम, अभिजित पाटील, अरुण म्हाकवे, अमोल पाटील आदी उपस्थित होते.

टायरी जाळल्या; सहा जणांवर गुन्हा

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर रंकाळा टॉवर येथे टायरी जाळून रस्ता रोको केल्याप्रकरणी 6 आंदोलकांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रणजित मोरस्कर,  नंदकुमार यादव, गणेश सुतार, शुभम लोहार, 
विजय लोहार, महेश लोहार (सर्व रा. रंकाळा टॉवर परिसर) अशी गुन्हे दाखल केलेल्याची नावे आहेत. 

दुपारी चारच्या सुमारास आंदोलक घोषणा देत चौकात आले. घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला. यावेळी रस्त्यावर टायरी पेटविण्यात आल्या, याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना समजताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाणी मारून पेटलेल्या टायरी विझवल्या. जमावबंदी असतानाही रस्त्यावर टायरी पेटवून रहदारीला अडथळा आणल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.