मराठा कॉलनीसह रुग्णालयाला छावणीचे स्वरूप

Last Updated: Apr 07 2020 1:00AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कसबा बावडा येथील मराठा कॉलनीत राहणार्‍या वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न होताच प्रशासनासह परिसरातील नागरिकांत भीती आणि चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांनी शासकीय रुग्णालयासह कॉलनी परिसराची पाहणी केली. मराठा कॉलनीकडे जाणारे सर्व रस्ते रोखण्यात आले आहेत. परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

मंगळवार पेठ येथील भक्तिपूजानगर परिसरात राहणार्‍या महिलेसह दोघांना पंधरवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनाने जाहीर केल्यानंतर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले होते. वैद्यकीय उपचारानंतर बाधित रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा प्रशासनाने दावा केल्यानंतर नागरिकांनी मोकळा श्वास घेतला असतानाच सोमवारी सायंकाळी कसबा बावडा येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरताच शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, जिल्हा आरोग्याधिकारी योगेश साळे आदींनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन खबरदारीच्या उपायसंदर्भात अधिकार्‍यांना सूचना केल्या. रुग्णालय आवारात तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. प्रवेशद्वारही बंद करण्यात आले.

सायंकाळी वरिष्ठाधिकार्‍यांनी कसबा बावडा येथील मराठा कॉलनी व बाधित महिलेच्या निवासस्थानाची पाहणी केली. महिलेच्या नातेवाईकांसह घरालगत असलेल्या नागरिकांकडे चौकशी करण्यात आली. कॉलनीला जोडणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले होते. मुख्य रस्त्यावर बॅरेकेटिंग लावण्यात आले आहे. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लॉकडाऊनचा काटेकोर अंमल

कसबा बावडा येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याने संचारबंदी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश डॉ. देशमुख यांनी शाहूपुरी पोलिसांना दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन आणि विनाकारण मोकाटपणे वावरणार्‍यांविरुद्ध  खटले दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.