Thu, Jul 18, 2019 04:06होमपेज › Kolhapur › मोर्चा, ठिय्या आंदोलन स्थगित

मोर्चा, ठिय्या आंदोलन स्थगित

Published On: Sep 02 2018 1:12AM | Last Updated: Sep 02 2018 1:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणप्रश्‍नी विशेष अधिवेशन बोलवावे, या प्रमुख मागणीसह अन्य 19 मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत. मराठा आरक्षणप्रश्‍नी राज्य शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने शनिवारी आंदोलकांशी चर्चा केली. यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या सहीचे तसे लेखी आश्‍वासन आंदोलकांना राजर्षी शाहू जन्मस्थळी देण्यात आले. सरकारवर अद्याप आमचा विश्‍वास नाही. मात्र, शाहू महाराज, दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांच्या आवाहनाला मान देत, जनतेचा विचार करून, कोल्हापुरात सुरू असलेले ठिय्या आंदोलन आणि मुंबई मोर्चा एक डिसेंबरपर्यंत स्थगित करत असल्याची घोषणा, सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. राज्य शासन मराठा समाजाला शंभर टक्के टिकाऊ आरक्षण देईल, आमच्या नीतीत खोट नाही, अशी स्पष्ट ग्वाही महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हे आरक्षण कशा पद्धतीने दिले जाईल, हे राज्य शासनाने स्पष्ट करावे, याकरिता विशेष अधिवेशन बोलवावे, या प्रमुख मागणीसाठी ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू केले होते. गेले 42 दिवस हे आंदोलन सुरू होते. संपूर्ण राज्यात या आंदोलनाने वेगळा आदर्श निर्माण केला. या मागण्यांबाबत चार सप्टेंबर रोजी मुंबईत स्वाभिमान मराठा वाहन मोर्चा काढण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला होता. या मोर्चाला सर्वच स्तरांतून पाठिंबा मिळत होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर या ठिय्या आंदोलनाची राज्य शासनाने दखल घेतली.

मंत्रिमंडळ उपसमितीची आंदोलकांशी चर्चा

आरक्षणप्रश्‍नी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे, दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या आंदोलकांशी शासकीय विश्रामगृहावर शनिवारी सायंकाळी चर्चा केली. सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या 19 मूळ मागण्यांसह एकूण 22 मागण्यांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली. वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, स्वप्निल पार्टे, सचिन तोडकर, गुलाबराव घोरपडे, राजू लिंग्रस आदींनी मागण्यांबाबत समितीपुढे आपली भूमिका स्पष्ट केली. माजी मुख्यमंत्री राणे यांनी, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण कसे देता येईल, त्यावर राज्य शासन कसे काम करत आहे, कोणत्या मागण्या कशा पूर्ण होतील, त्याची अंमलबजावणी कशी होईल, याबाबतची माहिती दिली. या मागण्या मान्य करत असल्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे पत्र द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावर मंत्रिमंडळाची ही उपसमिती आहे, त्यांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र दिले जात असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. मागण्यांबाबतचे लेखी आश्‍वासन देत असल्याने हे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन आंदोलकांना करण्यात आले. 

यानंतर सर्व जण कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळी ‘लक्ष्मी विलास’ पॅलेस येथे आले. लोकराजा राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत असल्याचे लेखी पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शाहू महाराज आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्‍काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

मराठा आरक्षण देणारच : पालकमंत्री

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, या सरकारला  मराठा  समाजाला आरक्षण द्यायचेच आहे  आणि ते टिकणारे आरक्षण द्यायचे आहे आणि हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार. याकरिता उपसमिती नेमली आहे, त्याची दर मंगळवारी बैठक होेत असते. या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत, त्याच्या पूर्ततेबाबत आणि अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू असते, त्यानुसार कार्यवाहीही सुरू आहे. समाजाला टिकणारे आरक्षण कसे देता येईल, याबाबत हैदराबाद अ‍ॅक्ट कसा आहे, कर्नाटकात काय परिस्थिती आहे, याचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी माणसे काम करत आहेत. दिल्लीतही सरकारची माणसे याबाबत कार्यरत आहेत. या सर्व गोष्टी सांगायची गरज नाही, पण आमच्यावर विश्‍वास ठेवा.

अहवाल येताच अधिवेशन

मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्याखेरीज याप्रश्‍नी चर्चा करून उपयोग नाही. यामुळे तो अहवाल आल्याखेरीज अधिवेशन घेणे योग्य होणार नाही. अहवाल आल्यानंतर लगेचच विशेष अधिवेशन बोलवले जाईल, असे सांगत पाटील म्हणाले,  गेल्या 42 दिवसांपासून ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेल्या या आंदोलनाद्वारे केलेल्या मागण्या लेखी स्वरूपात हव्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर आम्ही सातत्याने शाहू महाराज, डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा करत होतो, त्यांच्याशी सल्लामसलत करत होतो. त्यातून सर्व मागण्या मान्य करण्याचे ‘ऑन पेपर’ आले. आंदोलकांनीही चर्चेची सकारात्मक भूमिका घेतली आणि आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल आपण त्यांचे आभार व्यक्‍त करतो, असेही पाटील यांनी स्पष्ट करत मान्य करण्यात आलेल्या सर्व मागण्यांची यादी वाचून दाखवली. यावेळी आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके, आ. सुजित मिणचेकर, आ. अमल महाडिक, आ. प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

शाहू महाराज, डॉ. जाधव, डॉ. पवार यांच्या आवाहनालाअनुसरून आंदोलन स्थगित

यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने त्याच ठिकाणी पत्रकार परिषद झाली. वसंतराव मुळीक म्हणाले, गेली 42 दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे. चार सप्टेंबर रोजी वाहन मोर्चा काढण्यात येणार होता, त्याला संपूर्ण राज्यातून प्रतिसाद मिळत चालला होता. यामुळे प्रश्‍नांची तीव्रता राज्यभर वाढत चालली होती. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शाहू महाराज, डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला. शाहू महाराज, डॉ.जाधव, डॉ. पवार यांच्या आवाहनाला अनुसरून हे आंदोलन स्थगित करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

इंद्रजित सावंत म्हणाले, आम्ही सरकारच्या दारात जाणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट केले होते. सरकारने राजर्षी शाहूंच्या चरणी यावे, अशी आमची भूमिका होती, आज आंदोलनाचा विजय झाला आहे. शाहू महाराज, डॉ. जाधव, डॉ. पवार यांनी सांगितले म्हणून आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत; पण आमचा सरकारवर विश्‍वास नाही. दिलीप देसाई म्हणाले, राज्य सरकारने 22 मागण्या मंजूर केल्या आहेत. त्याबाबत एक डिसेंबरची डेडलाईन आहे. त्या कालावधीत पूर्तता झाली नाही, तर पुन्हा अधिक ताकतीने हे आंदोलन केले जाईल. हर्षल सुर्वे म्हणाले, सरकारने यापूर्वी अनेकदा पत्रे दिली आहेत. मात्र, उपसमितीच्या आदेशाने जिल्हाधिकार्‍यांनी हे पत्र दिले आहे. शाहू महाराज, डॉ. जाधव यांच्या उपस्थितीत हे पत्र दिले आहे, त्यामुळे यापुढे दर पंधरा दिवसाला मागण्यांबाबत काय अंमलबजवाणी केली जात आहे, त्याचा आढावा घेतला जाईल. त्यासाठी आंदोलकांना वेळ दिला पाहिजे, अशा भावना व्यक्‍त केल्या.

टिकाऊ आरक्षणाची पालकमंत्र्यांची ग्वाही

राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसा जपणार्‍या शिवाजी पेठेने मराठा समाजासह कोल्हापूरच्या विविध प्रश्‍नांसाठी सातत्याने योगदान दिले आहे. याची दाखल सरकारने घेतली असून, मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 15 नोव्हेंबरपर्यंत आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. यानंतर आंदोलकांना त्यांचा मार्ग मोकळा राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासनाने आश्‍वासन दिल्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. आरक्षणाचा लढा थांबलेला नाही, असे ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी यावेळी सांगितले.

आंदोलन स्थगितीची अधिकृत घोषणा ‘शाहू जन्मस्थळ’ लक्ष्मी विलास पॅलेस येथे झाली. यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके, आ. प्रकाश आबिटकर यांनी शिवाजी चौकातील शौर्यपीठ आणि शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात जाऊन आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. सुरुवातीला शिवाजी चौक येथे उभारण्यात आलेल्या शौर्यपीठास भेट दिली. या ठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागण्या मान्य करत असल्याचे पत्र प्रसाद जाधव, राजू जाधव, राजू सावंत, प्रकाश सरनाईक, जयदीप शेळके यांना दिले. त्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. तसेच शिवाजी मंदिरात रविवारी होणारी गोलमेज परिषदही रद्द करत असल्याचे सांगितले.

यानंतर शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरामध्येही भेट दिली. सर्वांचे स्वागत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य सरकारमध्ये वर्षाला 20 हजार नोकर्‍या उपलब्ध होतात. त्यातील टक्केवारीनुसार 3 हजार 300 नोकर्‍यांची संधी मराठा समाजाला मिळेल. हा आकडा जरी कमी असला, तरी मराठ्यांना आरक्षण काळाची गरज आहे. याचबरोबर शिक्षण, वसतिगृहे आणि विविध प्रकारच्या सवलतीची कर्जे याचाही मराठा तरुणांना लाभ घ्यावा.

आरक्षणाचा लढा थांबलेला नाही : डॉ. प्रतापसिंह जाधव

मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचे ठोस अश्‍वासन राज्य शासनाने दिल्याने मराठा समाजाचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. याचा अर्थ आरक्षणाचा लढा थांबलेला नाही, अशी स्पष्ट भूमिका दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मांडली. ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उतरून अनेक महिन्यांपासून लढा सुरू ठेवला आहे. या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री, पालकमंत्री व मंत्रिमंडळाने घेतली आहे; पण आरक्षणासाठी घाईगडबड न करता कायद्याच्या चौकटीत बसवून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध आहेत. आज मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून सुमारे अर्धा तास मराठा आरक्षणावर चर्चा केली. 15 नोव्हेंबरपर्यंत मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल प्राप्त होईल. तो आल्यानंतर मराठ्यांना आरक्षण कसे देता येईल, याबाबत सर्वांनी एकत्रित बसून चर्चा करू. तामिळनाडू सरकारने पेरियार समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण दिले, त्या पद्धतीने परिशिष्ट 9 मध्ये बसवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागणार आहे. यापूर्वी यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत मराठ्यांचे 11 मुख्यमंत्री झाले; पण ते मराठ्यांना का आरक्षण देऊ शकले नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शासन बदलले म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे म्हणणे चुकीचे नाही का? कायद्याच्या चौकटीत बसवून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. नोव्हेंबरपर्यंत जर मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, तर डिसेंबरमध्ये पुन्हा आंदोलन करण्यासाठी तुम्हाला मुभा असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. शिवाजी पेठेत जी चळवळ उभी केली जाते, ती कोल्हापूरभर पसरते. कोल्हापुरातील चळवळ राज्यभर पसरते. आता मराठ्यांना आरक्षण विद्यमान सरकार देऊ शकेल, असा विश्‍वास डॉ. जाधव यांनी व्यक्‍त केला. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री सक्रिय आहेत. एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याचेही मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. आरक्षणप्रश्‍नी कोणत्याही प्रकारे माघार घेतली जाणार नाही. आम्ही सर्व आंदोलकांच्या पाठीशी असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.

यावेळी आ. चंद्रदीप नरके, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश क्षीरसागर,  शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित राऊत, माजी आ. सुरेश साळोखे, माजी नगरसेवक रवीकिरण इंगवले, सुरेश जरग, शाहीर दिलीप सावंत, प्रकाश सरनाईक, कपिल सरनाईक, प्रताप देसाई यांच्यासह आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.