Wed, May 22, 2019 22:18होमपेज › Kolhapur › मराठा दक्ष आता आरक्षण हेच लक्ष्य

मराठा दक्ष आता आरक्षण हेच लक्ष्य

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:40AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. सकल मराठा समाज बांधव आपआपल्या परीने आंदोलने छेडत आहेत. बुधवारी येथील सकल मराठा समाज बांधवांनी ‘मराठा दक्ष आता आरक्षण लक्ष’असे म्हणत ऐेतिहासिक रंकाळा तलावात उड्या ठोकल्या. शवासन धारण करून आंदोलकांनी दोन तास आत्मक्‍लेश आंदोलन छेडले. हे आंदोलन अधिकच उग्र करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ध्वजारोहणानंतर ग्रामसभा घेऊन ‘मराठा समाजाला आरक्षण’ मिळण्याबाबतचा पाठिंब्याचा ठराव करून दसरा चौकातील समन्वय समितीकडे आणून दिला. यामध्ये श्री ज्वाला सह.दूध संस्था, श्री हनुमान सहकारी दूध संस्था, जोतिर्लिंग सहकारी दूध संस्था, यशवंत सहकारी दूध संस्था, तात्यासाहेब कोरे सहकारी दूध संस्था, नवजीवन विकास सेवा संस्था,श्री यशवंत सेवा संस्था,   सावर्डे तर्फ सातवे, शुभलक्ष्मी महिला सहकारी दूध संस्था बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा), ग्रामपंचायत सावर्डे व आमतेवाडी यांनी मराठा आरक्षण पाठिंब्याबाबतचे ठराव आणून दिले. सेनापती संताजी घोरपडे छात्रालयाच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दिला. तसेच निर्माण फौंडेशन उचगाव, कोगे, चिखली ग्रामस्थ उपस्थित होते. गोंडस घोळका ग्रुप, हणमंतवाडी, सकल मराठा समाज मोहडे (ता. राधानगरी),  सोनाळी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीने मराठा आरक्षणास पाठिंबा दिला.  ग्रामस्थांनी आंदोलन स्थळी येऊन पाठिंबा देत ठिय्या मांडला. ‘एक मराठा ...लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्‍काचे....नाही कुणाच्या बापाचे’ यासह निषेधाच्या घोषणांनी चौक दणाणला. दसरा चौकात दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, वसंतराव मुळीक, स्वप्निल पार्टे, गणी आजरेकर,अवधूत पाटील, शुभम शिरहट्टी, संदीप पाटील, ओंकार नलवडे, ऋषिकेश पाटील, प्रताप नाईक, महादेव पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर रंकाळा तलावात आत्मक्‍लेश शवासन आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी प्रसाद जाधव, परेश भोसले, नामदेव कुदळे, प्रकाश सरनाईक, राजू जाधव, उदय लाड, राहुल इंगवले, चंद्रकांत पाटील, राजू सावंत, शिवराजसिंह गायकवाड, जयदीप शेळके, संपतराव पाटील, सुधा सरनाईक, सुवर्णा मिठारी, स्मिता हराळे, सुनीता पाटील, सरिता सासने आदी उपस्थित होते. 

दसरा चौकातील ठिय्या आंदोलन गर्दी कायम 

गेली तेवीस दिवस ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणास दिरंगाई होत असल्याने बेमुत ठिय्या आंदोलन 9 ऑगस्टपासून छेडण्यात आले आहे. तेविसाव्या दिवशीही येथील गर्दी कायम आहे. 

बैतुलमाल कमिटीची सलोखा रॅली 

 जिल्हा बैतुलमाल कमिटीने सलोखा रॅली काढून दसरा चौकातील ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी खा. धनंजय महाडिक, आ. राजेश क्षीरसागर यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

आंदोलकांच्या पाठीशी ठाम राहू : आमदार राजेश क्षीरसागर 

विधानसभेमध्ये मराठा  आरक्षण मिळावे म्हणून सातत्याने आवाज उठवत आहे. आरक्षण मिळेतोपर्यंत आंदोलकांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचा निर्धार करून आ. क्षीरसागर म्हणाले, आंदोलनात फूट पाडण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.त्यामुळे सर्वांनी दक्ष रहावे, असे आवाहन केले. 

आरक्षणासाठी सातत्य ठेवू : खासदार महाडिक 

खासदार धनंजय महाडिक यांनी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनास्थळी भेट दिली. यावेळी ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सातत्याने लोकसभेत उपस्थित केला आहे. यापुढेही हा प्रश्‍न लावू धरू. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी एकसंघ राहण्याचेही आवाहन केले. तरुणांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. आंदोलकांच्या बरोबरच आपण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.