Mon, Jul 22, 2019 13:12होमपेज › Kolhapur › लोखंडी ग्रील वाकवून पोलिस कोठडीतून चार आरोपी पळाले

लोखंडी ग्रील वाकवून पोलिस कोठडीतून चार आरोपी पळाले

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 19 2018 1:28AMमलकापूर : वार्ताहर

घरफोड्या व दरोड्याप्रकरणी अटक केलेल्या सूरज्या-गोंद्या टोळीतील चार आरोपींनी शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास पोलिस कोठडीचे लोखंडी ग्रील वाकवून पलायन केले.ही घटना शाहूवाडी पोलिस ठाण्यात घडली. विशेष म्हणजे या आरोपींनी यापूर्वीही एकदा पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या होत्या. असे असताना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिस झोपेत असल्याने आरोपी पळाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सूरज सर्जेराव दबडे (वय 22, वाठारपैकी साखरवाडी, ता. हातकणंगले), ओंकार महेश सूर्यवंशी (19, रा. बँक ऑफ इंडियासमोर, कासेगाव, ता. वाळवा), गोविंद वसंत माळी (19, रा. यशवंतनगर कॉलनी, कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) व विराज गणेश कारंडे (19, रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) अशी पलायन केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

शुक्रवारी पहाटे चार आरोपींनी लॉकअपच्या दरवाजाचे लोखंडी ग्रील वाकवून पलायन केले. थोड्याच वेळात आरोपी पळाल्याचे ठाण्यातील पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेसंदर्भात माहिती घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी श्‍वानपथकास पाचारण करण्यात आले होते. परंतु, या श्‍वानपथकाने लॉकअपपासून ओकोली फाट्यापर्यंत माग काढला. हे आरोपी शेजारच्या सांगली, रत्नागिरी जिल्ह्यात किंवा गोवा, कर्नाटक राज्यात गेले असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने आरोपींचा शोध घेण्यासाठी साखरपा, कासेगाव, सांगली, कोल्हापूर, पेठ वडगावसह गोवा, कर्नाटक आदी ठिकाणी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

पोलिस कोठडीच्या सुरक्षिततेसाठी सहायक फौजदार  विश्‍वनाथ शेडगे, पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत दाभोळकर, महेंद्र पाटील यांनी  नियुक्त करण्यात आले  होते, तर पोलिस डायरीसाठी सुरेश ढवळे, वायरलेसला महिला पोलिस कॉन्स्टेबल हे पोलिस कर्मचारी उपस्थित असताना हे आरोपी लोखंडी ग्रील तोडून पळून गेलेच कसे?  यावेळी पोलिस काय करीत होते? असे अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत. 

पोलिस कोठडीसमोरील सी. सी.टी.व्ही. कॅमेरा बंद होता, असे सांगण्यात आले. आरोपी चौकीसमोरून पळून जाताना दुसर्‍या एका सी.सी.टी.व्ही.कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. महामार्गाच्या दोन्ही दिशेने ते पळून गेले आहेत. यापैकी दोघे मोटारसायकलवरून पळून गेल्याचे सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यात पहायला मिळते. त्यामुळे या आरोपींनी पळून जाण्याचा प्लॅॅन पद्धतशीरपणे रचला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पोलिस कोठडीचा दरवाजा लोखंडी ग्रीलचा आहे. मात्र, दरवाजाच्या लोखंडी पट्ट्या जीर्ण झाल्या आहेत. याचाच फायदा घेत त्या वाकवून पलायन करण्यात आरोपी यशस्वी झाले. हे चारही आरोपी चोर्‍या, घरफोड्या प्रकरणातील आहेत. ते सबजेलला शिक्षा भोगत होते. त्यांना शाहूवाडी तालुक्यातील घरफोड्या, चोर्‍यांच्या तपासासाठी दि. 16 मे रोजी शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्याची मुदत 19 मे रोजी संपणार होती. त्यापूर्वीच त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी  देऊन पलायन केले.

शाहूवाडी ग्रामीण विभागाचे पोलिस उपअधीक्षक आर. आर.पाटील यांनी  कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी पोलिस ठाण्यास भेट दिली.हे आरोपी दरोडा व घरफोडीप्रकरणी रिमांडमध्ये होते. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी धुमाकूळ घातला होता. यापूर्वीही कासेगाव पोलिसांना चकवा देऊन त्यांनी पोबारा केला होता.