Mon, Nov 19, 2018 10:44होमपेज › Kolhapur › आज संक्रांत तिळगूळ घ्या... गोड बोला

आज संक्रांत तिळगूळ घ्या... गोड बोला

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 12:14AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी
तिळात मिसळला गूळ...
त्याचा केला लाडू,
मधूर नात्यांसाठी 
गोड गोड बोलू...

सोशल मीडियाच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या अशा भरभरून शुभेच्छा देत संक्रांतीपूर्वीच म्हणजे शनिवारी सणाची सुरुवात झाली. तिळाची वडी, लाडू यासह हलवा बनवण्यात महिलांचा उत्साह दुणावला होता. वसा पूजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांनी आज बाजारात गर्दी केली होती. 

संक्रांत म्हणजे गोडवा. तिळागुळाच्या हलव्याच्या बाजारात राशी लागल्या आहेत. रंगीबेरंगी लहान-मोठ्या आकारातील तिळगुळे, रेवड्या हातगाडीवर विक्री केले जात आहेत. तर तिळाचे लाडू, तिळाची खमंग खुसखुशीत वडी आदी पदार्थांसह तिळगुळाच्या आकर्षक दागिन्यांनी बाजारात गर्दी केली आहे. हलवा आणि तिळगुळाचे दागिने खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. लहान मुले व तरुणाई तिळगूळ, तसेच आपल्या मित्र- मैत्रिणींसाठी भेटवस्तू खरेदी करण्यात व्यस्त होते. संक्रांत सणात तिळाचे महत्त्व अधिक आहे. उष्णतावर्धक तीळ या दिवसात खायला मिळावेत, यासाठी तिळाची वडी, तिळाची चटणी, तिळाचे लाडू, तीळ आणि गुळाची पोळी आदी पदार्थ बनवले जातात. हलवा, तिळाची मिठाई आणि संक्रांत पूजनासाठीचे सुगड बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. सुगडाचे खण 20 रुपयांनी विक्री केले जात होते. तिळगुळे 60 व 80 रुपये किलो आहेत. संक्रांतीच्या हळदी-कुंकवासाठी, तसेच लहान मुलांना बोरन्हाण घालण्यासाठी तिळगुळ्याच्या आकर्षक दागिन्यांनी बाजारपेठ सजली आहे. तिळगुळ्याचा हार, किरिट, मनगटी, बाजुबंद, कमरपट्टा, सुहासिनींसाठी तिळगुळ्याचे मंगळसूत्र, हार, कर्णफुले आदी वस्तूंनी गर्दी केली आहे.  संक्रांतीमुळे बाजारात काळ्या रंगातील कपड्यांनी गर्दी केली आहे. घरोघरी संक्रांतीची तयारी सुरू आहे.