Thu, Jun 27, 2019 18:19होमपेज › Kolhapur › महाशिवरात्र : शिव आणि शक्‍तीच्या मिलनाचे महापर्व

महाशिवरात्र : शिव आणि शक्‍तीच्या मिलनाचे महापर्व

Published On: Feb 13 2018 7:29AM | Last Updated: Feb 13 2018 7:29AMकोल्हापूर : सु. ल. हिंगणे

माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते. तसे पाहायला गेल्यास हिंदू धर्मग्रंथांमधील उल्लेखांनुसार, भगवान शंकराला प्रत्येक महिन्याची चतुर्दशी प्रिय आहे; परंतु संपूर्ण वर्षभरात माघ महिन्यातील चतुर्दशी शंकराला अतिप्रिय आहे, असे मानले जाते. सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे तीन गुण मानले गेले असून, त्यातील तमोगुणाचा प्रभाव दिवसापेक्षा रात्री अधिक असतो, अशी धारणा आहे. गरुडपुराण, पद्मपुराण, स्कंदपुराण, शिवपुराण तसेच अग्‍निपुराणातही शिवरात्रीच्या पर्वाचा महिमा वर्णन केला आहे. शिवरात्रीच्या संदर्भात केवळ एकच कथा नसून, अनेक कथा सांगितल्या जातात. या पर्वाचे महत्त्व एकसारखेच सांगितले गेले आहे. या दिवशी उपवास केला जातो. तसेच शिवमहिम्याचे गुणगान केले जाते. बेलाची पाने अर्पण करून भगवान शंकराची पूजाअर्चा केली जाते.  

महाशिवरात्र हे शिव आणि शक्‍तीच्या मिलनाचे महापर्व आहे. फाल्गुनमासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या रात्री आदिदेव भगवान शिव कोट्यवधी सूर्यांच्या तेजाइतक्या महातेजस्वी लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले, असा उल्लेख ईशान-संहितेत आहे. शिवपुराणाच्या विद्येश्‍वर संहितेतील कथेनुसार, शंकराच्या निष्कल म्हणजे निराकार स्वरूपाचे प्रतीक असणारे लिंग याच पवित्र तिथीला प्रकटले आणि सर्वप्रथम ब्रह्मा आणि विष्णू यांनी त्याची पूजा केली होती. त्यामुळेच ही तिथी शिवरात्र या नावाने प्रसिद्ध झाली. जो भक्‍त महाशिवरात्रीला उपवास करून, इंद्रियांवर विजय मिळवून पूर्ण शक्‍ती आणि सामर्थ्यानिशी निश्‍चल भावनेने भगवान शंकराची पूजा करतो, त्याला संपूर्ण वर्षभर शिवपूजा केल्याचे फळ एकट्या महाशिवरात्रीच्या पूजेने मिळते, अशी मान्यता आहे. शिवपुराणाच्या कोटिरुद्रसंहितेत शिवरात्रीच्या व्रताचा विधी आणि महिमा वर्णन केला आहे. शंकराच्या आराधनेसाठी केल्या जाणार्‍या सर्व व्रतवैकल्यांमध्ये महाशिवरात्रीचे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे.  

स्कंदपुराणात या महाव्रताची महती वर्णन करताना म्हटले आहे की, हे शिवरात्रीचे व्रत परात्पर आहे. म्हणजेच, यासारखे दुसरे अन्य व्रत असू शकत नाही. स्कंदपुराणाच्या नागरखंडात ऋषींनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना सूतजी म्हणतात, माघ महिन्यातील पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात जी चतुर्दशी येते, ती रात्र म्हणजेच शिवरात्र होय. त्या दिवशी सर्वव्यापी भगवान शंकर सर्व शिवलिंगांमध्ये विशेष रूपाने संचार करतात. कलियुगात या दिवशी केलेले व्रत कमी परिश्रमात साध्य होऊनसुद्धा पुण्यप्रद तसेच सर्व पापांचा नाश करणारे आहे. जी मनोकामना मनात ठेवून व्यक्‍ती या दिवशी व्रत करेल, ती कामना अवश्य पूर्ण होईल. या जगात जी चल आणि अचल शिवलिंगे आहेत, त्या सर्वांमध्ये या रात्री शिव आणि शक्‍तीचा संचार होतो. त्यामुळेच या रात्रीला शिवरात्र असे म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने वर्षभर केलेल्या पापांमुळे कलुषित झालेले मन शुद्ध होते. जो मनुष्य शिवरात्रीला भगवान शंकराची पाच मंत्रांसहित गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य अशा पंचोपचारांनी पूजा करतो, तो पापमुक्‍त होतो. ओम सद्योजातायनमः, ओम वामदेवायनमः, ओम अघोरायनमः, ओम ईशानायनमः आणि ओम तत्पुरुषायनमः असे हे पाच मंत्र आहेत. 

या दिवशी स्त्री-पुरुषांनी स्नानादी नित्यकर्म आटोपून सर्वप्रथम शिवपुत्र गणेशाचे स्मरण करून शंकराच्या मंदिरात वा घरात शिवलिंगासमोर उभे राहून व्रताचा संकल्प करावा. महाशिवरात्रीच्या व्रतात उपवासाला महत्त्व आहे. तसेच रात्रभर जागरण केल्यास भगवान शंकराची अनुकंपा प्राप्त होते, असे सांगितले गेले आहे. यासंदर्भात स्वतः भगवान शंकराचे असे सांगणे आहे की, ‘फाल्गुन मासाच्या कृष्ण पक्षातील अर्धरात्रिव्यापिनी चतुर्दशीला जागरण, उपवास आणि आराधना केल्यास मी जेवढा संतुष्ट होईन, तेवढा अन्य कोणत्याही व्रताने होणार नाही. कलियुगात मला प्राप्त करण्याचा हाच सोपा आणि सुगम उपाय आहे.’ यावेळी रुद्रपठण आणि रुद्राभिषेकालाही मोठे महत्त्व आहे. सामर्थ्यवान, सक्षम अशा पुरोहिताकरवी रुद्रार्चन करावे. पंचाक्षरमंत्र म्हणजेच नमःशिवाय या मंत्राद्वारे पवित्र पाणी, गायीचे दूध, पंचामृत आदींनी शिवलिंगाला अभिषेक करावा. शिवरात्रीच्या चारही प्रहरांमध्ये पृथक पूजनाला विशेष महत्त्व आहे. रात्रीच्या प्रथम प्रहरी दुधाने, दुसर्‍या प्रहरी दह्याने, तिसर्‍या प्रहरी तुपाने तर शेवटच्या आणि चौथ्या प्रहरी मधाने शिवलिंगाला अभिषेक केल्याने इच्छित कामना पूर्ण होतात.  

शंकराला बेलाची पाने अत्यंत प्रिय असतात. त्यामुळे कमीत कमी 11 अखंडित बिल्वपत्रे शिवलिंगाला अर्पण करावीत. भगवान शंकराला प्रिय असणारी फुले अर्पण करावीत. शिवपुराणात म्हटले आहे की, देवाधिदेव महादेवाच्या अष्टमूर्तींनी अवघे ब्रह्मांड व्यापले आहे. त्यामुळे विश्‍वाच्या संपूर्ण सत्तेचे संचालन त्याच्यामार्फतच होते.