Mon, Aug 19, 2019 18:39होमपेज › Kolhapur › अपंग विकास महामंडळ नामधारीच!

अपंग विकास महामंडळ नामधारीच!

Published On: Feb 02 2018 1:32AM | Last Updated: Feb 01 2018 9:44PMकोल्हापूर : डी.बी.चव्हाण

अपंग बांधवांनी स्वयंरोजगार सुरू करून स्वतःचा चरितार्थ चालवावा, दुसर्‍यावर फार अवलंबून राहू नये, यासाठी त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचा कारभार महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडे सोपविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात शासनाने आदेश काढले असून अपंग विकास महामंडळास योजना हस्तांतर करण्याची सूचना केली आहे. 

राज्यातील अपंग बांधवांना स्वयंरोजगारासाठी कर्ज रूपाने आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने 3 डिसेंबर 2001 रोजी राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापन केली आहे. पण सद्य:स्थितीत जिल्हा पातळीवर योजना राबविण्यासाठी स्वतंत्र कार्यालये स्थापन केलेली नाहीत. तसेच शासनाचे प्रचलित धोरण लक्षात घेता जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालये तातडीने सुरू करणे सहज साध्य होणार नाही, यास्तव या महामंडळाचे काम हे अन्य यंत्रणेकडून करून घेण्यात येणार आहे. 

सध्या या महामंडळाची कामे इतर मागासवर्ग महामंडळामार्फत राबविण्यात येत होतीत. परंतु, 9 मार्च 2017 या अधिसूचनेन्वये इतर मागासवर्ग महामंडळाचे कामकाज विमुक्‍त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग यांचे अखत्यारित येतेे, त्यामुळे अपंग विकास महामंडळाची जबाबदारी इतर मागासवर्ग विकास महामंडळाकडून काढून घेऊन ती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडे सोपविण्याचा निर्णय झाला आहे. 

खरं तर हे महामंडळ स्थापन होऊन सुमारे 17 वर्षे झाली आहेत. या कालावधीत या महामंडळाकडून किती अपंग बांधवांना कर्जाचा लाभ झाला, हा संशोधनाचा विषय आहे. दुसरी बाब अशी की अपंगांच्या विकासासाठी महामंडळ, पण या महामंडळाचा कारभार अन्य महामंडळाकडे सोपविण्यात आल्याने त्यांची कार्यालये ज्या ठिकाणी असतील तेथे अपंग बांधवांना जावे लागत आहे. राज्यात काही ठिकाणी तिसर्‍या मजल्यावर या महामंडळाची कार्यालयात आले, अशा कार्यालयांच्या पायर्‍या चढत असताना अपंगांची चांगलीच दमछाक  होत आहे, तसेच या महामंडळाचा कारभार सक्षमपणे चालवून अपंग बांधवांना न्याय देण्याची गरज होती. पण शासनाने या महामंडळाकडील योजना काढून घेऊन त्याला नामधारी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

राज्यातील अपंगाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्थापना करण्यात आलेल्या या महामंडळाच्या योजनांना गती देण्यासाठी इतर मागासवर्ग महामंडळाऐवजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणार आहे. यामध्ये कर्जवाटप, अनुदान त्याशिवाय अन्य अनुषंगीक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच दिलेल्या कर्जाची वसुलीही मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणार आहे. या सर्वांसाठी लागणारा निधी हा अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. 

महामंडळाचा तिसर्‍यांदा कारभार वर्ग

महामंडळ स्थापन झाल्यानंतर पहिली काही वर्षे कार्यालय सुरू करणे, कर्मचारी नियुक्त्या आणि शासनाकडून निधी उपलब्ध करणे यामध्ये गेली. त्यानंतर निधी उपलब्ध झाल्यानंतर योजना राबविण्यासाठी शासनाने या महामंडळाचा कारभार अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडे सोपवला. या महामंडळात आर्थिक गैरव्यवहार झाला. त्यामुळे ‘अपंग विकास’ चा कारभार इतर मागासवर्ग विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला; पण इतर मागासवर्ग महामंडळाचा कारभार विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागामार्फत चालवला जात असल्याने अपंग विकासची जबाबदारी आता महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाकडे देण्यात आली आहे.