होमपेज › Kolhapur › गोकुळमध्ये महाडिक कुटुंबीयांचे २४ टँकर : सतेज पाटील

गोकुळमध्ये महाडिक कुटुंबीयांचे २४ टँकर : सतेज पाटील

Published On: Dec 07 2017 10:09PM | Last Updated: Dec 07 2017 10:09PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या कुटुंबीयांचे 24 टँकर असल्याचा आरोप काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. या टँकरचे पुरावे सादर करून महाडिक आणि सहकार्‍यांनी वैयक्‍तिक टीका करण्यापेक्षा ‘गोकुळ’मधील भ्रष्टाचाराच्या आरोपांना जाहीरपणे उत्तरे द्यावीत, असे आव्हान आ. पाटील यांनी दिले. गायीच्या दुधाला प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ दिल्याखेरीज हा लढा संपणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

वारणा दूध संघात दूध वाहतुकीसाठी प्रतिलिटर टँकरला जो दर दिला जातो, त्याच्यापेक्षा गोकुळमध्ये 50 पैसे अधिक दर का दिला जातो, असा प्रश्‍न आ. पाटील यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, की गोकुळमध्ये दूध वाहतुकीसाठी सर्वाधिक टँकर महादेवराव महाडिक यांच्याशी संबंधित कोल्हापूर आईस अँड कोल्ड स्टोअरेज कंपनीचे आहेत. या कंपनीचे 18 टँकर असून ही कंपनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे महादेवराव रामचंद्र महाडिक, राजन हिंदुराव शिंदे आणि सौ. मंगला महाडिक यांच्या नावाने नोंद आहे. यापैकी राजन शिंदे ही व्यक्‍ती महादेवराव महाडिक यांच्याशी संबंधित आहे. वरील कंपनीबरोबरच श्री व्यंकटेश्‍वरा गुड्स मुव्हर्स प्रा. लि. चा एक आणि अमल महादेवराव महाडिक व स्वरूप महादेवराव महाडिक यांच्या नावाने प्रत्येकी एक त्याचबरोबर राजन हिंदुराव शिंदे यांच्या नावाने दोन असे एकूण 24 टँकर महाडिक कुटुंबीयांचे आहेत.

आ. पाटील यांनी गोकुळमधील भ्रष्टाचाराविरोधात काढलेल्या मोर्चानंतर प्रतिमोर्चा गुरुवारी माजी आमदार महादेवराव महाडिक, खा. धनंजय महाडिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आयोजित केला. या मोर्चावेळी झालेल्या व्यक्‍तिगत टीकेला उत्तर देणार नसून केवळ गोकुळमधील भ्रष्टाचाराबाबत आपण बोलत आहोत, असे आ. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, महाडिक कुटुंबीय आपले टँकरच नाहीत म्हणतात, म्हणूनच त्याबाबतचे पुरावे गोळा केले. गेल्या दहा वर्षांत सहकारी संस्थांमध्ये पारदर्शी कारभार सुरू आहे. बहुतेक साखर कारखान्यांनी रेस्ट हाऊस, जेवणावळी आणि संचालकांची वाहने बंद केली; पण गोकुळमध्ये अजून ती प्रथा सुरूच आहे. डॉक्टरांच्या नावाखाली संचालकांना वाहने पुरविली जात आहेत. आपल्या साखर कारखान्याने गेल्या वर्षी 2650 रुपये एफआरपी दिली, त्याची माहिती न घेताच आरोप केले जात आहेत.

दुधाला दरवाढ दिल्यास आपण गोकुळच्या संचालकांचा जाहीर सत्कार करू आणि कार्यक्रमाला आणण्यासाठी त्यांना गोकुळची नव्हे तर स्वतंत्र वाहने पाठवू, असे सांगून आ. पाटील म्हणाले की, दूध उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक आणि लूट थांबल्याशिवाय आता आपला लढा थांबणार नाही. गोकुळमधील भ्रष्टाचाराबाबत आपण उघडलेल्या मोहिमेपासून दूध उत्पादकांचा पाठिंबा आपल्याला मिळत आहे. तेथील वर्चस्व संपणार हीच भीती आता महाडिक कुटुंबीयांना आहे. आम्ही मोर्चा काढला त्यावेळी सभासदांबरोबर रस्त्यावर उतरलो; पण संचालकांनी काढलेल्या मोर्चात स्वतःला गाद्या व लोडची व्यवस्था व्यासपीठावर केली आणि मोर्चातील मंडळी मात्र भर उन्हात तळपत राहिली.

टँकरमधून मिळणार्‍या लोण्यावर एक जमात गोकुळमध्ये पोसली जात असून या बोक्यांना आता हटविल्याशिवाय गप्प राहू शकत नाही, असे मारुती जाधव (गुरुजी) यांनी यावेळी सांगितले. मोर्चाला गर्दी होण्यासाठी गोकुळच्या सुपरवायझरना प्रत्येकी पंधरा जीप भरून आणण्याचे आदेश देण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला. काहीजणांना रोजंदारीवर आणून मोर्चात गर्दी केली; पण खर्‍या दूध उत्पादकांची गर्दी आता गोकुळच्या संचालकांना धडा शिकवणारच, असे जाधव यांनी सांगितले. दूध उत्पादकांना जादा दर मिळू नये म्हणून महाडिक आणि कंपनीने संपूर्ण जिल्ह्याला वेठीस धरल्याचे माजी जि. प. सदस्य बाबासाहेब देवकर यांनीसांगितले. यावेळी काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्ष अंजना रेडेकर, बाळासाहेब कुपेकर, योगीराज गायकवाड उपस्थित होते.