Sat, Jul 20, 2019 23:21होमपेज › Kolhapur › ‘लुडो’ गेम... नव्हे लुटो गेम...

‘लुडो’ गेम... नव्हे लुटो गेम...

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 15 2018 10:54PMगडहिंग्लज ः प्रवीण आजगेकर

मोबाईल गेम म्हटले की, धकाधकीच्या जीवनात काही काळ निव्वळ मजा लुटून चिंतामुक्‍त होण्याचा एक प्रकार, असाच समज सर्वत्र आहे. अलीकडे जगात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या अँड्रॉईड मोबाईलकरिता हजारो गेम्स उपलब्ध झाले आहेत. मात्र, आता यातील काही गेममध्ये गुंतून युवक आर्थिक दुष्टचक्रात अडकत जात असून, याद्वारे एकप्रकारे मटक्याचाच प्रकार सहजरीत्या उपलब्ध झाला आहे. अशाच ‘लुडो’ गेममध्ये युवक अक्षरशः लुटले जात असून, तीन पानी जुगारप्रमाणेच यामध्ये खेळ खेळला जात असून, पैसेही त्याप्रमाणेच लावले जात असल्याने अनेक युवक याच्या आहारी गेले आहेत. केवळ शहरामध्येच नाही, तर ग्रामीण भागांमध्येही या गेमने आता कहर केला आहे. पोलिसही यावर सध्यातरी काहीच करू शकत नसल्याने ‘लुडो’ गेेमची ‘लुटो’ योजना सुरूच आहे.

‘लुडो’ हा गेम अतिशय प्राचीन काळातील असून, यामध्ये राजा व राणी यांच्यात हा खेळ खेळला जात असे. सापशिडी खेळाप्रमाणेच फासा टाकून खेळण्याचा हा प्रकार. या खेळाला हजारो वर्षांची परंपरा असून, अगदी अजिंठा वेरूळ लेण्यांमध्येही हा खेळ कोरला आहे. ज्यामुळे संपूर्ण महाभारतही घडले, असा हा खेळ अलीकडे मात्र युवकांमध्ये फारच प्रसिद्ध होत आहे. फाशावर आलेल्या टिपक्यांच्या संख्येप्रमाणे वाटचाल करून अन्य खेळाडूंना हरवून जो जिंकेल तो या खेळाचा ‘राजा’ समजला जातो. मात्र, याच गेमवर पैसे लावून खेळण्याचे प्रकार शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही वाढीस लागले आहेत. निव्वळ खेळाचा आनंद लुटण्याच्या उद्देशालाच सोयीस्करपणे मटक्याचे स्वरूप दिले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये या गेमने आपले अस्तित्व सुरू ठेवले असून, हा ऑनलाईन जुगारअड्डाच सुरू झाला आहे. या गेमसाठी केवळ चार जणांची गरज असून, दोन ते चार जणांना घरबसल्या अथवा कोणत्याही ठिकाणी खेळता येणारा हा गेम आहे. लहान-मुलांपासून कोणत्याही व्यक्‍तीला तो खेळता येतो. मात्र, याच गेमचा सोयीस्करपणे जुगाराप्रमाणे वापर करण्याचे प्रकार युवकांकडून सुरू आहेत. चौघे जण मिळून प्रत्येकी 5 रुपयांपासून कितीही पुढे पैसे जमा करायचे. शेवटी जो जिंकेल त्याला सगळी रक्‍कम द्यायची, असा प्रकार काही ठिकाणी निदर्शनास येत आहे. प्रथमदर्शनी पारकट्ट्यांवर टाईमपास म्हणून मुले खेळत असावीत, असा समज सार्‍यांचाच होत असला, तरी यामागे दडलेला सट्टा दिवाळखोरीत काढणारा ठरत आहे. या गेमच्या माध्यमातून होत असलेली आर्थिक उलाढाल गुन्हेगारी, व्यसनाधीनतेला खतपाणी घालणारी ठरत आहे. सायंकाळनंतर अनेक ठिकाणच्या पारकट्ट्यांवर ‘टाईमपास’च्या नावाखाली सुरू असलेला हा ‘खेळ’ आता जुगारामध्ये गणला जाऊ लागला आहे. 

कमी कालावधीमध्ये अधिक पैसे मिळवण्यासाठी अनेक युवक याच्या आहारी जात असून, पैशाच्या हव्यासापोटी अनेक शाळा-कॉलेजचे युवक कोवळ्या वयात अशा गेम्समध्ये गुरफटले जात आहेत. परिणामी, भविष्यात मटक्याच्या इतर प्रकारांकडे वळून आयुष्य बरबाद करण्याकडे त्यांची वाटचाल होण्याची अधिक शक्यता आहे. गेम म्हणजे मनोरंजनाचा प्रकार अशीच मानसिकता समाजात असली, तरी अशा गेममुळे उद्याचा नागरिक म्हणून पाहिल्या जाणार्‍या युवकांना रोखणे समाजासमोर आव्हान उभे ठाकले आहे. निव्वळ खेळाचा प्रकार म्हणून सहजरीत्या उपलब्ध होत असलेल्या या जुगारी खेळावर वचक कोण ठेवणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

यापूर्वीही पूल टेबल गेम अशाच प्रकारे झाला होता. या लुडो गेमबाबतही भारतातील काही राज्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्यानंतर त्याठिकाणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या गेमची क्रेझ वाढली असून, यामध्ये गुरफटलेली तरुणाई मात्र जुगाराप्रमाणे व्यसनाधीन होऊन आपले उमलते आयुष्य बरबाद करून घेत आहे. पोलिसांच्या सायबर विभागाने याकडे आता लक्ष देणे आवश्यक असून, पालकांनीही मुलांच्या मोबाईलमधील गेमकडे लक्ष देणे आवश्यक बनले आहे.

‘ब्ल्यू व्हेल’प्रमाणे ‘लुडो’ची घातकतेकडे वाटचाल

गेल्या वर्षभरापूर्वी मोबाईलद्वारे खेळल्या जाणार्‍या ‘ब्ल्यू व्हेल’ गेमने सर्वत्र खळबळ माजवली होती. या गेममध्ये सहभागी झालेले युवक सहजतेने आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याने याबाबत बंदी घालण्यात आली होती. अशाच प्रकारे ‘लुडो’चीही वाटचाल सुरू असून, यामध्ये गुरफटलेला युवक जुगार्‍याप्रमाणे व्यसनाधीन होऊन आर्थिक समस्येमध्ये अडकत चालला आहे. यामुळे आता याकडेही लक्ष ठेवणे आवश्यक बनले आहे.


ग्रामीण भागात ‘चौकडी’

अनेकदा ग्रामीण भागामध्ये एकाच ठिकाणी चौघेजण मोबाईलमध्ये डोके घालून खेळताना अनेकदा दिसत असून, ही चौकडी म्हणजेच ‘लुडो’चे चार खेळाडू असून, यामधून ‘लुडो किंग’ होण्यासाठी चौघांची धडपड सुरू असते. सुरुवातीला 5 रुपयांपासून सुरू होणारी रक्‍कम युवकांकडून 5 हजार रुपयांपर्यंत जात असल्याने याबाबत पालकांनी सावधानता बाळगणे आवश्यक बनले आहे.