Tue, Jul 23, 2019 10:46होमपेज › Kolhapur › कर्जमाफीच्या रकमांवर बँकांचा डोळा!

कर्जमाफीच्या रकमांवर बँकांचा डोळा!

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 12:34AMकुडित्रे : प्रतिनिधी

पाठीमागील कर्जमाफीचा अनुभव चांगला नसल्यामुळे कर्जमाफी देताना राज्य शासनाने हजार चाळणी लावल्या. याद्यावर याद्या काढायला लावल्या. अखेर काही जणांना कर्जमाफी झाली. रक्कम खात्यावर जमा झाली. परत आता झारीतले शुक्राचार्य जागे झाले आहेत. या जमा रकमेवर आता बँकांचा डोळा असून कर्जमाफी रूपाने मिळालेल्या रकमेतून त्या पटीत ठेवी ठेवण्यासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरत असल्याच्या तक्रारी आहेत. वर्षाअखेरीस कर्मचार्‍यांना दिलेले ठेवीचे टार्गेट हंटिंग  करण्यासाठी सर्वच बँकांमध्ये हा प्रकार होत आहे.

शेतकर्‍यांचा  7/12 कोरा करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सत्तेत भागीदारी करणार्‍या शिवसेनेनेही कर्जमाफीसाठी रान उठवले होते. कर्जमाफी मिळावी म्हणून सर्वच विरोधी पक्षांनी जनजागृती यात्रा काढल्या. शेतकर्‍यांत असंतोष निर्माण झाला. अखेर सरकारने टप्प्याटप्प्याने का होईना कर्जमाफीची घोषणा केली. याला यापूर्वीच्या कर्जमाफीतील  रामायण  कारणीभूत आहे. आताच्या कर्जमाफीत दीड लाखापर्यंतच्या थकीत कर्जापोटी बँकांना परतावा व नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना कर्जाच्या तीन टक्के किंवा जास्तीत जास्त 25 हजार रुपये शेतकर्‍यांच्या बँक अकौंटवर जमा करण्याचे आदेश झाले.

रक्कम खात्यावर जमा होईपर्यंत घालमेल होती. पण, नोव्हेंबरपासून कर्जमाफीच्या रकमा खात्यावर जमा होऊ लागल्याने शेतकर्‍यांचा कर्जमाफीवर विश्‍वास बसू लागला. थकीत कर्जदारांची रक्कम थेट कर्जाला जमा झाली. पण, नियमित कर्जफेड करणार्‍या प्रामाणिक शेतकर्‍यांच्या खात्यात थेट रक्कम जमा झाली. ही रक्कम पाच हजारापासून पंचवीस हजारांपर्यंत आहे. अशी मोठी रक्कम जमा झाल्यावर या रकमेकडे  ठेवीसाठी आयता सोर्स म्हणून बँकांचे कर्मचारी पाहत आहेत. विशेषतः सहकारी बँकांच्या कर्मचार्‍यांना ठेवी जमा करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने दिले आहे. अर्थात जिल्हा बँका, सहकारी बँका एवढेच नव्हे तर राष्ट्रीयीकृत आणि कार्पोरेट बँकांही शेतकर्‍यांच्या मागे लागल्या आहेत. वर्षाअखेर जवळ येईल तसा हा वेग वाढत चालला आहे. ही खुशीची, प्रेमाची सक्ती जाचक ठरत आहे. अवघड जाग्याचं दुखणं असल्याप्रमाणे ठेव ठेवता येणं शक्य नाही व नाहीही म्हणता येत नाही, अशा कोंडीत शेतकरी आहेत.

 डोळे पाण्यानं भरलं!

 नियमित परतफेड करणार्‍या एका शेतकर्‍याच्या खात्यावर कर्जमाफीचे पंधरा हजार रुपये एका बँकेच्या शाखेत जमा झाले. त्यापैकी सहा हजार रुपये त्याला ठेव ठेवाय पाहिजेत म्हणून सक्ती सुरू केली. त्यानं  साहेब, ठेव ठेवणं जमणारं नाही. तशी परिस्थिती असती तर कर्ज कशाला काढलं असतं. म्हणून सगळे पैसे द्या, म्हणून डोळ्यात पाणी आणून विनवण्या केल्या. शेवटी ऐकतच नाहीत म्हटल्यावर रुद्रावतार धारण करून पैसे काय तुमच्या बापाचं हाईत काय? असं ताणल्यावर गपगुमान रक्कम दिली.