Tue, Jul 23, 2019 11:51होमपेज › Kolhapur › सावकारांच्या कपाळी  पक्ष, संघटनांचा टिळा!

सावकारांच्या कपाळी  पक्ष, संघटनांचा टिळा!

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 06 2018 12:10AMकोल्हापूर : सुनील कदम

कोल्हापूर शहर आणि परिसरात खासगी सावकारी करणारे बहुतेक सगळे सावकार हे वेगवेगळ्या राजकीय पक्ष आणि संघटनांशी वेगवेगळ्या स्वरूपाचे ‘नातेसंबंध’ ठेवून असल्याचे दिसते. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मिळत असलेल्या या प्रकारच्या राजकीय आश्रयामुळे  सावकार मुजोर बनले आहेत.  सावकारांच्या डोक्यावर असलेला राजकीय वरदहस्त संपवून ही पिलावळ ठेचण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात जेवढ्या म्हणून खासगी सावकारी टोळ्या कार्यरत आहेत, त्यापैकी बहुतेकांचे म्होरके हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी वेगवेगळ्या माध्यमातून निगडित असल्याचे दिसते. यापैकी काही सावकारांची शहर आणि परिसरातील वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या दरबारात ऊठबस असलेली दिसते. विशेष म्हणजे काही सावकार तर अनेकवेळा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आणि संघटनांच्या व्यासपीठावरही हजेरी लावताना दिसतात. सावकारीच्या माध्यमातून सुरू असलेले आपले काळे धंदे लपविण्यासाठीच या लोकांनी राजकीय पक्ष आणि संघटनांशी जाणीवपूर्वक लागेबांधे निर्माण केल्याचे दिसते. त्याचा वापर ही सावकार मंडळी आपल्या धंद्यासाठी करताना दिसतात. वेगवेगळे राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि संघटनांशी ही सावकार मंडळी संबंधित असल्यामुळे सर्वसामान्य जनता आणि कर्जदार त्यांच्याशी पंगा घ्यायला धजावत नाहीत. त्याचा गैरफायदा घेऊन सावकारांनी गोरगरिबांच्या मुंड्या मुरगाळायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

सावकारांच्या डोक्यावरील हा राजकीय वरदहस्त दूर केल्याशिवाय त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणणे सहजासहजी शक्य होणार नाही. कोणकोणत्या राजकीय पक्षाच्या अथवा नेत्यांच्या नावाने आपली सावकारीची दुकानदारी चालवित असेल तर त्याचे खापर एक ना एक दिवस त्यांच्याच डोक्यावर फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजकीय पक्ष आणि नेत्यांनी तातडीने अशा सावकारांना झुरळ झटकावे तसे आपल्या ‘राजकीय कुटुंब-कबिल्यातून’ झटकून टाकण्याची आवश्यकता आहे; अन्यथा भविष्यात त्यांनाही या सावकारांच्या काळ्या कृत्यांची झळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
आपली सावकारी विनासायास चालावी यासाठी कोण कोण सावकार आपल्या राजकीय उबेला आले आहेत, याची बहुतेक सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना बहुदा जाणीव असावी. मात्र, राजकीय सोयीसाठी त्यांच्याकडून या सावकार मंडळींना अभय मिळत असावे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि या सावकारी पाशात अडकलेल्या कर्जदारांमधून अशा राजकीय नेत्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे.