Tue, May 21, 2019 00:37होमपेज › Kolhapur › अल्पसंख्याक दर्जासाठी लिंगायत समाजाचा मोर्चा; विशेष बातचीत 

लिंगायत समाजाच्या मोर्चाविषयी विशेष बातचीत 

Published On: Jan 23 2018 4:20PM | Last Updated: Jan 23 2018 6:39PMमहादेव कांबळे : पुढारी ऑनलाईन, कोल्हापूर

देशात इतर धर्माप्रमाणे लिंगायत धर्माला स्‍वतंत्र धर्माची मान्यता देण्यात यावी, इतर धर्मियांप्रमाणे लिंगायत धर्मियांना संविधानिक अधिकार देण्यात यावे, समाजात असणार्‍या लिंगायत अल्‍पसंख्यांक शाळांना विशेष अधिकार देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना दिली. 

लिंगायत धर्माला संविधानिक मान्‍यता देण्यात यावी, अल्‍पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा यासाठी लातूर, सांगली आणि कर्नाटकमध्ये मोठ्या सख्येने मोर्चे निघाले. कोल्‍हापूरमध्ये येत्या २८ जानेवारीला लिंगायत समाजाचा विराट मोर्चा निघत आहे. यानिमित्त कोल्‍हापुरातील लिंगायत समाजाच्या मोर्चाच्या आयोजक सरलाताई पाटील आणि राजशेखर तंबाके यांनी पुढारीबरोबर संवाद साधला. 

प्रश्न : लातूर, सांगली, कर्नाटक आणि आता कोल्‍हापुरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाव्‍दारे कोणत्‍या मागण्यात येत आहेत. 

उत्तर : शासकीय योजनांपासून लिंगायत समाज कित्येक वर्षे वंचित आहे. अन्य जाती, धर्माच्या नागरिकांना ज्याप्रकारे शासकीय योजनांचा लाभ मिळतो त्याप्रमाणे या समाजाला मिळत नाहीत. १८७१ ते १९३१ पर्यंत लिंगायत धर्माला स्‍वतंत्र धर्म म्‍हणून मान्‍यता होती, नोंद होती. सर्वोच्च न्यायालयाच्या म्‍हणण्यानुसार लिंगायत धर्माची स्‍वतंत्र धर्म म्‍हणून नोंद करण्यात आली होती. याबाबत हिंदू विवाह कायद्यामध्येही याची नोंद असल्याचे आढळते. पण, स्‍वतंत्र धर्म म्‍हणून १९३१ नंतर मात्र मान्‍यता देण्यात आली नाही. 

या मोर्चाव्‍दारे लिंगायत धर्माला स्वंतत्र धर्माची मान्यता देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारला जाग आणण्यासाठी शंभर दिवसांची मुदत देण्यात येणार असून, या मागण्या मान्य झाल्या नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा लिंगायत समाजाकडून देण्यात आला आहे. 

प्रश्न : लिंगायत धर्म अवैदिक धर्म आहे. आचरण पध्दती, तात्‍विक अधिष्ठान हिंदू धर्मापेक्षा वेगळी आहे. तरीही स्‍वतंत्र धर्म म्‍हणून मान्‍यता देण्यात आली नाही याबाबत सरकारकडून कोणत्या अपेक्षा व्‍यक्‍त करण्यात आल्या आहेत.

उत्तर : लिंगायत धर्म अवैदिक धर्म आहे, लिंगायत धर्मातील संस्‍कृतीला, साहित्याला धर्माधिष्ठित एक वेगळी उंची आहे. या वचन साहित्यातून समाजाला आदर्श संदेश देण्याचे काम लिंगायत साहित्याकडून करण्यात आले आहे. ७७० शरणांनी लोकशाही पध्दतीने लिंगायत धर्माच्या साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे. या मोर्चाद्वारे वचन साहित्याचा प्रसार, धार्मिक स्थळांचे जतन करण्यासाठी सरकारकडून भरघोस निधी देण्याची मागणीही करण्यात येणार आहे. मात्र, या वेळी आमची प्रमुख मागणी हिच असणार आहे, की लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यात यावी.

प्रश्न : कर्नाटकमध्ये मोठ्या संख्येने मोर्चे निघाले आहेत. याबाबत कर्नाटक सरकारची काय भूमिका आहे?

उत्तर : कर्नाटक राज्यात लिंगायत समाजाकडून बहुसंख्येने मोर्चे काढण्यात आले. या वेळीही स्वतंत्र धर्माची मागणी, शिक्षण क्षेत्रात सवलत, लिंगायत शिक्षण संस्थामधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना ५० टक्के जागा राखीव,  अशा विविध मागण्या कर्नाटकातही करण्यात आल्या आहेत. लिंगायत समाजाच्या  सामाजिक प्रगतीसाठी कर्नाटक सरकारकडून आता न्यायमूर्ती नाग मोहनदास यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर कर्नाटक सरकार सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे कर्नाटक मोर्चा आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

प्रश्न : लिंगायत धर्माच्या साहित्यनिर्मितीबद्दल सरकारकडून काय अपेक्षा आहेत?

उत्तर : माता नागाई, अल्लमप्रभू, सिद्धराम, चेन्नय्या, कक्कय्या, मडीवाळ माचय्या, चिक्कया, अक्कमहादेवी, दासीमय्या, चेन्नबसवण्णा यांनी  महात्मा बसवेशवर यांच्या बरोबरीने  लिंगायत साहित्याला मोठे योगदान दिले आहे.

७७० शरणांनी धर्म साहित्य लोकशाही पध्दतीने तयार केले आहे. याबरोबरच लिंगायत धर्म व वचन साहित्यातील नैतिक शिक्षण देण्याचा लिंगायत अल्पसंख्याक शाळांना अधिकार मिळावे यासाठीही सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे. यामुळे लिंगायत साहित्याचे महत्व इतर भाषांना व भाषा अभ्यासकांना उपयुक्‍त ठरणार आहे.

प्रश्न : लिंगायत समाजाच्या ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करण्यासाठी सरकारला काय उपाय योजना सुचवणार आहात. ?

उत्तर : लिंगायत समाजाचा साहित्यिक, सांस्कृतिक वारसा मोठा आहे. तो समाजातील प्रत्येकाने जपला पाहिजे. १२ व्या शतकात बसवेश्वर यांनी आदर्श समाज कसा असावा, भेदाभेद विसरून मानवतावाद किती श्रेष्ठ आहे हे सांगितले आहे. बाराव्या शतकात सवर्ण आणि दलित एकत्र करून समाजातील भेदाभेद नष्ठ करण्यासाठी बसवेश्वर यांनी मोठी क्रांती केली आहे. त्या काळात रूढी परंपरा नाकारून मनातील विकार हेच दु:खाचे मुख्य कारण असल्याचे त्‍यांनी सांगितले आहे. बसवेश्र्वर यांचा वारसा जतन करण्यासाठी लिंगायत धार्मिक स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असून लिंगायत मठ संस्थांना भरीव आर्थिक तरतूद देण्यात यावी अशीही मागणी करण्यात येणार आहे.  याद्वारे लिंगायत समाजाची संस्कृती, शरणांच्या गुहांचे रक्षण व जतन करण्याची मागणी  करण्यात आली आहे.

प्रश्न : लिंगायत समाजाने मराठा क्रांती मोर्चानंतर विराट मोर्चाचे आयोजन केले आहे का? 

उत्तर : मराठी क्रांती मोर्चानंतर लिंगायत समाजाने मोर्चाचे आयोजन केले असे नाही तर, २०१४ पासून लिंगायत समाजाकडून सरकारकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. याबाबत सरकारकडून समितीही स्‍थापन करण्यात आली आहे. या समितीकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले असून, समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी म्‍हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्‍कालीन पाणी पुरवठा मंत्री मधुकर चव्‍हाण, परिवहन मंत्री दिलीप सोपल व सामाजिक न्‍याय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्‍थापना करण्यात आली. या समितीने लिंगायत समाजाला लोकसंख्येनुसार अल्‍पसंख्याक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस केली. पण, गेल्‍या साडेतीन वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यासाठी या लिंगायत समाजाच्या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रश्न : कोल्हापुरातील लिंगायत समाजाच्या मोर्चाचे नियोजन कशा प्रकारे करण्यात आले आहे.?

उत्तर : कोल्हापुरातील लिंगायत समाजाच्या या धडक मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. २८ जानेवारी रोजी या मोर्चाचे नियोजन करणयात आले असून दसरा चौक येथे सकाळी दहा वाजता
लिंगायत समाज एकवटणार आहे. यावेळी येथे विविध मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोर्चावेळी १६ वर्षे वयाच्या यश अंबोळे याचे व्याख्यान होणार आहे. यानंतर लिंगायत समाजातर्फे  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून ९६ वर्षांचे स्वातंत्र्यसैनिक मुरग्यप्पा खुमसे यांच्या हस्ते जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात  येणार आहे. लिंगायत मोर्चा चालू असताना सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काटेकोर नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी स्वतंत्र वाहतूक व्‍यवस्‍था करण्यात आली आहे. मोर्चात सहभागी  झालेल्या नागरिकांना आरोग्याबाबतची कोणतीही समस्या जाणवल्यास ठिकठिकाणी स्वयंसेवक थांबविण्यात येणार आहेत. यासाठी तीन रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. फिरत्या स्‍वच्छतागृहांची ही व्यवस्था कोल्हापूर महानगरपालिकेकडून करुन देण्यात आली आहे.