Sun, Jul 21, 2019 16:28
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › लिंगायत समाजाचा आज महामोर्चा

लिंगायत समाजाचा आज महामोर्चा

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 1:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा द्यावा आणि लिंगायत समाजाला केंद्र शासनाकडून अल्पसंख्याक म्हणून मान्यता मिळावी, या मागण्यांसाठी उद्या, रविवारी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी 1,300 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोर्चाच्या वतीने लातूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुरगाप्पा खुमसे यांच्या हस्ते जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे. 

सकाळी दहा वाजल्यापासून ऐतिहासिक दसरा चौकात लोक जमा होणार आहेत. या ठिकाणी भव्य व्यासपीठ उभा करण्यात आले आहे. त्या ठिकाणी सभा होणार आहे. लोकांना बसण्यासाठी दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर हा रस्ता मोकळा करण्यात आला आहे. या ठिकाणचे पार्किंग काढण्यात आले असून, रस्त्याच्या कडेला असलेल्या जुना गाड्याही हलविण्यात आल्या असून, लाऊड स्पीकरची सोय केली आहे. व्यासपीठावर समाजातील एक युवक लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत मांडणी करणार आहे. तसेच लिंगायत समाजातील 5 धर्मगुरू मार्गदर्शन करणार आहेत. 

पार्किंग असे...
या मोर्चाला सर्व समाजांतील नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहनांसाठी शहरात आठ ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी एस्तेर पॅटर्न हायस्कूल मैदान, सासने मैदान, आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल मैदान, रेल्वेस्टेशन आवार, रंकाळा परिसर अशी पार्किंगची ठिकाणी आहेत. 

बंदोबस्त असा...
या मोर्चासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने 1,300 पोलिस कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. त्यामध्ये दोन अप्पर पोलिस अधीक्षक, 7 पोलिस उपअधीक्षक, 22 पोलिस निरीक्षक, 60 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 900 पोलिस कर्मचारी, 400 होमगार्ड, एसआरपीच्या दोन कंपन्या आदींचा समावेश आहे. 

वाहतूक मार्गात बदल
लिंगायत समाजाच्या मोर्चासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी गोकुळ हॉटेल ते सीपीआर चौक या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. ही वाहतूक गोकुळ हॉटेलपासून शाहूपुरीमार्गे गवत मंडईकडे वळवण्यात आली आहे. गोकुळ हॉटेल ते दसरा चौक या मार्गाला जोडणार्‍या पोट रस्त्यांचीही वाहतूक बंद करण्यात आली 
आहे.