Tue, Nov 20, 2018 21:03होमपेज › Kolhapur › लिंगायत समाज महामोर्चा शिस्तबद्ध होणार

लिंगायत समाज महामोर्चा शिस्तबद्ध होणार

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 1:03AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापुरात दि.28 जानेवारी रोजी काढण्यात येणारा लिंगायत समजाचा महामोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, असा विश्‍वास विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्‍त केला. मोर्चाच्या नियोजनाबाबत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

स्वतंत्र धर्म मागणीसाठी लिंगायत समाजाच्या वतीने दि.28 रोजी कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विविध जाती-धर्मांचे लोक सहभागी होणार आहेत. ते नियोजनातही सहकार्य करणार आहेत. लिंगायत समाज हा शांतताप्रिय समाज असून ते आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहेत. या मोर्चासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून तसेच सीमाभागातून लिंगायत समाजाचे लोक येणार असून कोणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजन कसे करावे, याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. वाहनांच्या पार्किंगकरिता विविध पर्यायांचा विचार करण्यात आला. 

या बैठकीसाठी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, ख्रिश्‍चन समाजाचे अनंतराव म्हाळुंगकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, बाबुराव बोडके, डी. आर. बोडके, अवधूत पाटील तसेच लिंगायत समाजाच्या सरलाताई पाटील, राजशेखर तंबाखे, बाबुराव तारळी, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, सुधीर पांगे, सुरेश शिंत्रे, विलास आंबोळे, चंद्रशेखर बटकडली, अण्णा माणगावे, बी. एन. कुन्जीरे, राजू गवळी, सर्जेराव विभूते यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.