Sat, Aug 17, 2019 16:38होमपेज › Kolhapur › रंकाळ्यात लाईट अँड साऊंड शो

रंकाळ्यात लाईट अँड साऊंड शो

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : सतीश सरीकर

ऐतिहासिक रंकाळा... कोल्हापूरचे वैभव... म्हणूनच कोल्हापुरात कोणीही आले, तर हमखास रंकाळ्याची हवा खायला जाणारच... परंतु, गेल्या काही वर्षांपासून रंकाळ्याला ग्रहण लागल्याची स्थिती होती... आता मात्र हळूहळू त्यात बदल होत आहे... बोटींमुळे तर रंकाळ्याचे रूपडे पालटले आहे... त्यात आणखी नावीन्याची भर पडणार आहे... लवकरच रंकाळ्याजवळील खणीत अत्याधुनिक यंत्राद्वारे पाण्याचा पडदा करून लाईट अँड साऊंड शो साकारला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने तब्बल 8 कोटींचा आराखडा तयार केला आहे. 

कोल्हापूरच्या अद्वितीय कलाकारांची आठवण करून देणारा एखादा कार्यक्रम असावा. पर्यटक व भाविकांना त्यातून कोल्हापूरची महती कळावी, यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. रंकाळा तलावाच्या मागील बाजूस असलेल्या खणीतील जागा त्यासाठी निवडण्यात आली आहे. या ठिकाणी कारंजे, लेसर, अतिशय प्रखर अशी प्रोजेक्शन आणि अत्याधुनिक ध्वनी-प्रकाश योजनेच्या सहाय्याने हुबेहुब चित्रकृती निर्माण केली जाणार आहे. फक्त रात्रीच्या वेळी हा कार्यक्रम असल्याने दिवसभर सर्वांना पोहण्यासाठी खणीचा वापर करता येणार आहे. सुमारे 250 ते 275 प्रेक्षक हा कार्यक्रम दररोज सायंकाळी पाहू शकतील. कार्यक्रमाचा कालावधी 15 ते 20 मिनिटांचा असून, तो पूर्णतः स्वयंचलित असेल. केवळ एका तंत्रज्ञाच्या माध्यमातून हा कार्यक्रम रोज दाखविण्यात येणार आहे. सुट्टीच्या आणि गर्दीच्या दिवशी गरजेनुसार कार्यक्रमाचे एकापेक्षा जास्त शो केले जाणार आहेत. कोल्हापूरच्या पर्यटनासाठी एक आगळे वेगळे आकर्षण या कार्यक्रमामुळे तयार होणार आहे. नाशिकच्या वन उद्यानात असा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवेशमूल्य असूनही महिन्याला सुमारे 60 हजारांवर पर्यटक त्याचा लाभ घेतात. कोल्हापुरातही माफक प्रवेश मूल्य ठेवल्यास कार्यक्रम यशस्वी होणार आहे.
 

Tags : kolhapur rankala, light, sound show  


  •