Tue, Sep 17, 2019 22:37होमपेज › Kolhapur › पोलिसांच्या सतर्कतेमुळे बुडणाऱ्या दोन महिलांचे वाचले प्राण

राधानगरी पोलिसांनी दोन महिलांना बुडताना वाचवले 

Published On: May 20 2019 9:09PM | Last Updated: May 21 2019 1:30AM
राशिवडे : प्रतिनिधी

वेळ सायंकाळी सहाची... ठिकाण राधानगरी तालुक्यातील पडळी. पर्यटन आणि राधानगरी येथील पाहुण्यांना भेटण्यास आलेल्या दोन महिला नदीपात्रात पाणी नसल्याने उतरल्या होत्या; परंतु राधानगरी धरणातून अचानक पाणी सोडल्याने त्या पाण्यात अडकल्या. पडळी ग्रामस्थ आणि राधानगरी पोलिसांच्या सतर्कतेने या दोन महिला बुडता-बुडता वाचल्या अन् त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

कोल्हापूर येथील सौ. अमृता नितीन साळवी (वय 32) व सौ. मीना सुभाष सुलताने (50) नातलगांसह राधानगरी पर्यटन आणि पाहुण्यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. पडळी येथील बंधार्‍याजवळ ही मंडळी पोहोचली. नदीपात्रात पाणी नसल्याने या दोन महिला पात्रात उतरल्या, तर इतर नातेवाईक नदीशेजारी गप्पागोष्टी करत बसले होते. राधानगरी धरणातून अचानक पाणी सोडल्याने या महिला नदीपात्रात अडकल्या. पाणी पातळी वाढू लागल्याने महिला बुडण्याची भीती वाढली. ग्रामस्थांनी राधानगरी पोलिसांना फोन केला. पोलिस उपनिरीक्षक गणेश कवितके, सचिन पारखे, संदीप ढेकळे, कृष्णा यादव यांनी क्षणाचाही विलंब न करता पडळी बंधार्‍याकडे धाव घेतली. राधानगरी धरणावरील पाटबंधारे कर्मचार्‍यांशी संपर्क साधून नदीपात्रात सोडलेले पाणी बंद करण्याच्या सूचना केल्या. तत्काळ तहसीलदार मीना निंबाळकर याही मदतीसाठी धावल्या. कवितके यांनी लाईफ जॅकेट, दोरखंडासह पोलिस कर्मचारी सचिन पारखे, कृष्णा यादव, संदीप ढेकळे, हनमंत उपलवाळकर व ग्रामस्थांच्या मदतीने या दोन महिलांना सुखरूप बाहेर काढले. जर ग्रामस्थ आणि पोलिस वेळेवर पोहोचले नसते, तर घटना वेगळीच घडली असती. पडळी ग्रामस्थ, राधानगरी पोलिस आणि पाटबंधारे विभागाचे या महिलांनी आभार मानले. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex