Tue, Apr 23, 2019 20:00होमपेज › Kolhapur › ‘लेव्ही’साठी नोटिसा

‘लेव्ही’साठी नोटिसा

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 06 2018 10:49PMकोल्हापूर : निवास चौगले

साखर कारखान्यांकडील दहा टक्के लेव्ही साखर बंद होऊन सहा वर्षे झाली; पण 2012 च्या हंगामात ज्या कारखान्यांनी कमी लेव्ही साखर दिली, त्या कारखान्यांना त्यावेळच्या बाजाराभावाप्रमाणे लेव्ही व खुल्या बाजारातील साखरेच्या दरातील फरकाची रक्‍कम भरण्याचे आदेश अन्‍न व नागरी पुरवठा मंत्रालयाने काढले आहेत.

या आदेशाचे पालन न करणार्‍या कारखान्यांना केंद्र सरकारकडून दिले जाणारे निर्यात अनुदान, शुगर विकास निधीतून कर्ज यासारख्या सुविधा मिळणार नाहीत, असे म्हटले आहे. देशातील 500 पैकी 269 कारखान्यांना या नोटिसा लागू झाल्या आहेत, त्यात महाराष्ट्रातील 55 कारखान्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 55 कारखान्यांनी लेव्हीच्या कोट्यापेक्षा 62 हजार 508 मेट्रिक टन साखर कमी दिली आहे. या साखरेच्या दरातील फरकाची रक्‍कम सुमारे 45 कोटी रुपये होते.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शिधापत्रिकेवर कमी दरात साखर दिली जाते. ही साखर सरकार साखर कारखान्यांकडून कमी दरात विकत घेत होते. कारखान्याच्या एकूण साखर उत्पादनाच्या दहा टक्के साखर ही या कारणासाठी द्यावी लागत होती. 1980 मध्ये हे प्रमाण 65 टक्के होते. त्यानंतर कमी कमी होत, हे प्रमाण 2012 साली दहा टक्क्यांवर आले. 2013 च्या हंगामापासून हा कोटाच रद्द झाला. शासनाने खुल्या बाजारातून साखर विकत घेऊन ती शिधापत्रिकेवर देण्यास सुरुवात केली.

आता 2012 च्या हंगामात ज्या कारखान्यांनी काही कारणांनी एकूण उत्पादनाच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी साखर लेव्हीसाठी दिली आहे, त्या कारखान्यांना केंद्र सरकारने नोटिसा पाठवून दर फरकाची रक्‍कम भरण्याचे आदेश दिले आहेत. अगोदरच उतरलेले साखरेचे दर, ठप्प मागणी आणि निर्यातीला अत्यल्प प्रतिसादामुळे एफआरपी देण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. महाराष्ट्रात अजूनही 519 कोटी रुपये कारखान्यांनी शेतकर्‍यांचे दिलेले नाहीत. अशा परिस्थितीत लेव्हीच्या फरकाची रक्‍कम भरण्याचे मोठे आव्हान कारखानदारांसमोर आहे.