Sun, Feb 17, 2019 15:27होमपेज › Kolhapur › सर्वभाषिक शाळांत मराठी  सक्तीची असावी : देशमुख

सर्वभाषिक शाळांत मराठी  सक्तीची असावी : देशमुख

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 05 2018 12:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठी भाषेच्या विकासाबरोबरच ती भाषा टिकली पाहिजे यासाठी सर्वभाषिक शाळांमध्ये मराठी अनिवार्य केली पाहिजे. केरळप्रमाणे महाराष्ट्रात मराठी लर्निंग अ‍ॅक्ट करावा, असे प्रतिपादन बडोदा येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. 

करवीर नगरीतील विविध संस्था आणि कोल्हापूर नगरीतर्फे आयोजित नागरी सत्कार समारंभात सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे होते. ज्येष्ठ विचारवंत दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते देशमुख यांचा गौरव करण्यात आला. येथील शाहू स्मारक भवनमध्ये हा समारंभ झाला. 

देशमुख म्हणाले, करवीर नगरीत काम करण्याचे भाग्य मला लाभले. शाहूनगरीत काम करताना त्यांच्या विचारांशी प्रतारणा होणार नाही याची खबरदारी घेतली. करवीरकरांनी मोठे सहकार्य केले आहे. त्यांनी माझ्या मनात मोठे स्थान निर्माण केले आहे. 
दत्तप्रसाद दाभोळकर म्हणाले, हा सोहळा आनंददायी प्रेरणादायी आहे. देशमुख यांना सर्जनशील वातावरण कोल्हापूरने दिले. त्यांनी या वातावरणात साहित्य निर्मिती केली. बखर प्रशासनाची हा ग्रंथ मोलाचा ठरला आहे.  

यावेळी डॉ. रणधीर शिंदे यांनी देशमुख यांच्या साहित्यविश्‍वाचा आढावा घेतला. प्रास्ताविक गिरीष फोंडे यांनी केले. अनुराधा भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी महापौर स्वाती यवलुजे यांनी देशमुख यांना शुभेच्छा दिल्या. मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी केलेे. प्रा.चंद्रकुमार नलगे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. देशमुख यांचा मानपत्र शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.अंजली देशमुख यांचा अनुराधा भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमास रजनी हिरळीकर, भालचंद्र कुलकर्णी, व्यंकाप्पा भोसले, नामदेव गावडे, चंद्रकांत जोशी आदी उपस्थित होते. यशवंत भालकर यांनी आभार मानले.