Sat, Aug 24, 2019 21:12होमपेज › Kolhapur › अभिमान बाळगा मायबोलीचा!

अभिमान बाळगा मायबोलीचा!

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 11:06PMकोल्हापूर : विजय पाटील 

मराठी पाऊल पडते पुढे! असं सतत म्हटलं जातं; पण सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात मराठी भाषा कमी बोलली जातेय, असा निराशेचा सूर सतत दिसून येतो. असा निराशेचा सूर आळवणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा सर्व्हे प्रसिद्ध झाला आहे. देशात सर्वाधिक बोलणार्‍या भाषेत मराठी तिसर्‍या  स्थानावर आहे. एकूणच अभिमान बाळगा मराठीचा, अशी ही स्वागतार्ह घटना आहे. कारण सव्वाशे कोटी लोकसंख्या असणार्‍या देशात मराठी तिसर्‍या क्रमांकाची भाषा आहे ही मराठी माणसांसाठी सुखावह करणारी घटना आहे. 

मुलांना इंग्रजी माध्यमाची शाळा हवी, असा हट्टाहास शहरात जास्त दिसून येतो. ग्रामीण भागात मात्र मराठी माध्यमातील शिक्षणाला महत्त्व आहे. इंग्रजी ही व्यवहाराची भाषा असल्याने ती आली पाहिजे याबद्दल दुमत नाही. हिंदीसह इतर भाषेंचेही ज्ञान असायला हवे. कारण जितक्या जास्त भाषा तितका व्यक्‍तिगत विकास होतो. भाषा जास्तीत जास्त शिकाव्यात;  पण मराठी माणसाला मराठी शंभर टक्के आली पाहिजे, हेही विसरता कामा नये.  अलीकडे आपल्या मातृभाषेतूनच मुलांना शिकवले तर त्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे अभ्यासांती सप्रमाण सिद्ध करणारी जागृती तज्ज्ञांकडून केली जात आहे. म्हणजे मातृभाषेला पर्याय नाही. महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटींच्या घरात आहे. 

गोव्यात मराठी बोलले जाते. कर्नाटकातील सीमाभागात तर पंचवीस लाख लोक मराठी बोलतात नव्हे जगतात, असं म्हणायलं हवं. बंगळूरमध्येही मराठी बोलणार्‍यांची संख्या दखल घेण्यासारखी आहे.  मध्य प्रदेशातील इंदौर, ग्वाल्हेर, देवास आदी शहरांत (जुनी मराठी संस्थान) मराठी बोलणार्‍यांची संख्या आहे. तामिळनाडू येथील तंजावरमध्येही मराठी रोटी-बेटीच्या परंपरेने मराठी बोलली जाते. गुजरातमधील बडोदासारख्या शहरातही मराठी अजूनही जिवंत आहे. 

 दिल्ली,  लखनौ, पाटणा, कोलकाता आदी ठिकाणी गलईचे काम करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील मराठी कारागीर मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. हरियाणातील सोनपत-पानिपत या पट्ट्यात अलीकडे रोड मराठा समाजाकडून मराठीचे धडे गिरवले जात आहे. या समाजाची लोकसंख्या पंधरा लाखांहून अधिक आहे. म्हणजे देशातील इतर राज्यांतही मराठी बोलणार्‍यांचे प्रमाण चांगले आहे.  या सर्व्हेत हिंदी पहिल्या स्थानावर आहे तर दुसर्‍या स्थानावर बंगाली आहे. मराठी बोलणारे तिसर्‍या क्रमांकावर म्हणजे ही खूपच चांगली गोष्ट आहे.