Mon, Jul 15, 2019 23:42होमपेज › Kolhapur › गोपिकांचा ढाकुम्माकुम...

गोपिकांचा ढाकुम्माकुम...

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 03 2018 12:52AMकोल्हापूर ः पूनम देशमुख 

एकेकाळी दहीहंडी हा साहसी प्रकार म्हणजे पुरुषांची मक्‍तेेेदारी समजला जायचा. एकसारखे टी शर्ट घालून रस्त्यावर दहीहंडी फोडणारे गोविंदा आणि त्यांच्या अंगावर पाण्याच्या बादल्या रिकाम्या करणार्‍या महिला हे द‍ृश्य ठरलेले असायचे. मात्र, अलीकडे मुलांप्रमाणेच महिला गोपिका पथके दहीहंडी खेळात सहभागी होत असून गोविंदा आला रे यापेक्षा गोपिका आल्या रे... असे चित्र आहे. 

पूर्वी हाताची साखळी धरत गोविंदा रे गोपाळाची गर्जना करीत घागरीचे पाणी आपल्या अंगावर झेलणारा गोविंदा आपल्या संस्कृतीचे प्रतीक होता. मात्र, ही परिस्थिती बदलली आज मर्दानी खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या खेळात महिला गोविंदा पथकही सहभागी होत आहेत. मुंबईत रूढ झालेली ही प्रथा नंतर राज्यभरात रूजली असून आता गोपिका या दहीहंडीच्या आकर्षण बिंदू ठरत आहेत.

 मुलांप्रमाणे कपाळावर गोविंदा रे गोपाळा अशी नामपट्टी बांधून टी शर्ट पॅन्टमध्ये फुल्‍ल गोपिकांच्या अ‍ॅटिट्यूडमध्ये गोपिका पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी खास गोपिकांसाठी दहीहंडीचे आयोजन केले जात आहे. संयम, एकाग्रता आणि एकजुटीच्या जोरावर एकावर एक थर रचत महिला गोविंदा पथक मोठ्या उत्साहात आणि आत्मविश्‍वासाने दहीहंडी फोडतानाचे चित्र अलीकडे पाहायला मिळतेेे आहे. कॉलेज, नोकरी आणि घरची जबाबदारी सांभाळत अनेक युवती रात्री मैदानावर एकत्र येत महिनाभर आधीपासून सराव करत असतात.

दहीहंडी हा खेळ नसून सण आहे. कोणत्याही धर्माच्या सणाला बाजारू आणि स्पर्धेचे रूप देणे चुकीचे आहे.  काही वर्षांपासून या सणामध्ये राजकारणी आणि गोविंदा मंडळांनी स्पर्धा आणली आहे. थरांचे व्रिकम करण्यासाठी गोविंदा पथकात चढा - ओढी सुरू आहेत. गोविंदाचे उंचावणारे थर पाहताना प्रत्येकाचा श्‍वास रोखले जातो. गोपिकांनीही मुलांप्रमाणे पाच सहा थरांपर्यंत मजल मारली असून उच्चांकी थर गाठण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी वरच्या थरासाठी चिमुकल्या मुला, मुलींच्या जीवाशी खेळ केला जात आहे. स्पर्धा, चुरस बाजूला सारत आनंद मिळवण्याच्या हेतूने हा सण साजरा करण्याची गरज आहे.