कोल्हापूर : सागर यादव
क्रीडानगरी कोल्हापुरात क्रिकेटच्या मैदानांसह स्पर्धा घेण्यासाठी आवश्यक असणारी खेळपट्टी उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. यामुळे स्पर्धा संयोजकांना चांगली खेळपट्टी असणारे मैदान उपलब्ध करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. क्रिकेटच्या खेळपट्ट्यांची संख्या शहरात मर्यादित असल्याने संयोजकांवर स्पर्धा बाहेर नेण्याची वेळ येत आहे.
येथील स्पर्धा बाहेर गेल्याने स्थानिक क्रिकेटपटूसह क्रिकेटप्रेमींवर एक प्रकारचा अन्यायच होणार आहे. क्रिकेटपटूंना स्पर्धा खेळण्यासाठी बाहेर जावे लागणार असल्याने साहजिकच त्याची धावपळ वाढणार आहे. क्रिकेटप्रेमींनाही चांगला खेळ पाहाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे. याशिवाय स्पर्धा संयोजकांनाही वेळ, श्रम, पैसा खर्च करून पर्याय शोधण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. स्पर्धा कोल्हापूर सोडून बाहेर गेल्याने स्थानिक खेळाडू, संघ यासह संबंधित घटकांवर परिणाम होणार आहे.
ब्रिटिश राजवटीपासूनची परंपरा
कोल्हापूरला क्रिकेट खेळाची ब्रिटिश राजवटीपासूनची परंपरा आहे. यानंतर संस्थानकाळात या खेळाची जोपासना आणि विकास होत गेला. अनेक नामवंत खेळाडू कोल्हापुरात निर्माण झाले. जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळाला सुसूत्रता आली. केडीसीए, केएसए अशा संस्था-संघटनांच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन सातत्याने होऊ लागले. यामुळे आज कोल्हापूरची शतकोत्तर क्रिकेट परंपरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नावारूपाला आली आहे.
मैदानांना मर्यादा
कोल्हापुरात क्रिकेटला स्वत:चे स्वतंत्र मैदान नसल्याचे वास्तव आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर एकेकाळी असणारी आंतरराष्ट्रीय विकेट मैदानावरील लोकांच्या वर्दळीमुळे नावापुरती उरली आहे. शाहूपुरी जिमखाना मैदान छोटे असल्याने त्याला मर्यादा आहे. शास्त्रीनगर मैदानाला अलीकडेच निधी उपलब्ध झाल्याने ते विकसित होत आहे. मनपाच्या गांधी मैदान, दुधाळी मैदान, मेरीवेदर ग्राऊंड, रुईकर कॉलनी मैदान, आयसोलेशन मैदान, कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानांना निधी नसल्याने त्यांचा विकास झालेला नाही, छत्रपती शाहू स्टेडियम, पोलो मैदान, तपोवन मैदान, पोलिस कवायत मैदान, शिवाजी विद्यापीठ मैदान, राजाराम कॉलेज, कदमवाडीतील डी. वाय.पाटील आदी मैदाने या खासगी व्यवस्थापनाखाली असल्याने त्यांना मर्यादा येत आहे.