Sun, May 26, 2019 19:02होमपेज › Kolhapur › कुरूंदवाडमध्ये शरद पवार यांच्या फोटोचा अवमान

कुरूंदवाडमध्ये शरद पवार यांच्या फोटोचा अवमान

Published On: Dec 18 2017 5:18PM | Last Updated: Dec 18 2017 5:18PM

बुकमार्क करा

कुरूंदवाड : वार्ताहर 

कुरूंदवाड पालिका सभागृहातील राष्ट्रवादीचे संस्थापक माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा फोटो स्टोअर विभागात अडगळीत टाकल्याने फोटोचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी  संतप्त झाले. यावेळी पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्याधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करीत निलंबनाची मागणीही करण्यात आली.  या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष जयराम पाटील यांना देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस चंगेजखान पठाण, कुरुंदवाड शहर अध्यक्ष जिन्नापा पवार, पालिकेचे उपनगराध्यक्ष किरणसिंह जोंग, राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.

दरम्यान नगराध्यक्ष पाटील यांनी याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले.

कुरुंदवाड पालिका सभागृहात २००१ सालापासून असलेले राष्ट्रवादीचे संस्थापक माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी हा फोटो रंग कामानिमित्त काढण्यात आला होता, ते पुन्हा लावण्यात आलेला नाही. दरम्यान हा फोटो दोन दिवसांपूर्वी स्टोअर विभागात अडगळीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या  निदर्शनास आल्यानंतर याबाबतची तक्रार जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली. यानंतर या प्रकरणाबद्दल आम. मुश्रीफांनी नाराजी व्यक्त करत नगराध्यक्ष पाटील यांना कारवाईबाबत निवेदन देण्यास पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या होत्या.

आज सकाळी ११ वाजता सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी मुख्याधिकार्‍यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

चंगेज खान पठाण बोलताना म्हणाले, आमचे नेते शरद पवार यांचा फोटो मी नगराध्यक्ष असताना २००१ साली ठराव करून लावण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी रंग कामानिमित्त तो फोटो काढण्यात आला तो, आजपर्यंत लावण्यात आलेला नाही. या पाठीमागचे गौड बंगाल काय, याबाबत पालिका सभागृहात खंतही व्यक्त केली होती. मुख्याधिकार्‍यांनी ही जबाबदारी स्वीकारून फोटो लावणे गरजेचे होते,मात्र तो फोटो आज अडगळीत ठेवण्यात आला आहे. ही बाब चुकीची असून  मुख्याधिकार्‍यांवर कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा पवित्रा घेण्यात आला. 

राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय पाटील म्हणाले शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्र चालतो. या नेत्यांचा फोटो अडगळीत टाकून अवमान केला आहे. मुख्याधिकाऱ्यांवर हक्कभंगाची कारवाईची मागणी करणार आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जिन्नाप्पा पवार, माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजुगडे, चंद्रकांत मोरे, बाळासाहेब गायकवाड, बबलू पवार, जवाहर पाटील, बाळासाहेब देसाई, आप्पासाहेब बंडगर, अशोक कमते आदिंनी जोरदार घोषणाबाजी करत निषेधात्मक भाषणे केली.

यावेळी मोर्चात राष्ट्रवादीचे नगरसेविका नरगीस बारगीर, स्नेहल कांबळे, फारूख जमादार, भोला बारगीर, सुनील चव्हाण, संजय खोत, भीमराव पाटील, शंकर पाटील, शबीर भिलवडे, दीपक पोमाजे, आर. आर. पाटील, बाबासाहेब सावगावे, एन. डी. पाटील, शंकर तोबरे, सचिन मोहिते, गजानन कोळी, सागर पाटील, महेश दळवींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले १८ जून २०१६ साली कुरूंदवाड पालिकेत सेवा सुरू केली. त्यादरम्यान माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या फोटोबाबत कोणतीच माहिती नव्हती. या फोटोंबाबतचा प्रकार मला आज समजला. माजी मंत्री शरद पवार यांचा फोटो सभागृहात लावून घेणार असल्याचे सांगितले.