Wed, Sep 19, 2018 12:25होमपेज › Kolhapur › कुंभी-कासारी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

कुंभी-कासारी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 1:49AMकुडित्रे : (प्रतिनिधी)  

 कुंभी-कासारी परिसरात सांगरूळ फाटा कोपार्डे (ता. करवीर) ते यशवंत बँकेदरम्यानच्या रस्त्यावर चोरट्यांनी दोन मोबाईल शॉपी फोडून हजारो रुपयांचे मोबाईल लंपास केले. एका दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून, तर एका दुकानाची पाठीमागील भिंत पोखरून ही चोरी केली. दुसर्‍या एका शॉपीचे कुलूप उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न फसला. प्रदीप गुरव यांच्या अष्ठविनायक मोबाईल शॉपीची मागील भिंत फोडून दुरुस्तीला आलेले मोबाईल बाहेर आणून टाकले, तर नवीन बारा-तेरा मोबाईल लंपास केले.

त्यानंतर काशीनाथ नंदिवाले यांच्या करवीर मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून एक लॅपटॉप व नवीन मोबाईल लंपास केले. याच रात्री सांगरूळ फाट्यावरील आणखी एका शॉपीत चोरीचा प्रयत्न केल्याचे समजते. करवीर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. काशीनाथ नंदिवाले यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्यावर चित्रीकरण झालेही असेल; पण याच दुकानासमोरील एका ज्वेलरी दुकानात पाच वर्षांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास अद्याप सुरूच आहे.