Mon, Jul 22, 2019 03:07होमपेज › Kolhapur › कॅशलेस धोरणामुळे अल्प दूध उत्पादक संकटात

कॅशलेस धोरणामुळे अल्प दूध उत्पादक संकटात

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 02 2018 11:48PMकुडित्रे : प्रतिनिधी 

राज्यातील सर्व प्राथमिक दूध संस्थांनी त्यांच्या दूध उत्पादक सभासदांना दूध पुरवठ्याच्या देयकाची रक्‍कम (दुधाची बिले)  थेट त्यांच्या बँक खात्यावर तसेच धनादेश विरहित पद्धतीने ऑनलाईन स्वरूपात जमा करण्याचे आदेश पशुसंवर्धन खात्याने दिले आहेत. सहायक निबंधक (दुग्ध) यांनी संस्थांना तसे आदेश दिले आहेत.  कॅशलेस व्यवहार कितीही आदर्श असले तरी वाड्या-वस्त्यांवर राहणार्‍या अल्प दूध उत्पादकांना मूलभूत बँकिंग सुविधाच उपलब्ध नसणार्‍या दूध उत्पादकांना ही सुविधा ‘असून अडचण नसून खोळंबा’ ठरणार आहे. बहुतांश दूध संस्थांनी या योजनेस विरोध दर्शविला आहे. राज्यातील सर्व दूध उत्पादकांचे व्यवहार  कॅशलेस  करण्याचा शासनाने चंग बांधला आहे. त्यानुसार सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) कोल्हापूर यांनी दि .18 जानेवारीच्या आदेशाद्वारे सर्व दूध संस्थांना दोन महिन्यांच्या आत सभासदाचे नाव, बँकेचा खाते क्रमांक, वर्ग केलेली रक्‍कम याची माहिती कळविण्यास सांगितले आहे. याबाबत कार्यवाही न करणार्‍या कर्मचार्‍यास, सचिवास पदावरून कमी करण्याची धमकी दिली आहे.

या निर्णयाबाबत सचिवांच्यात नाराजी आहेच, शिवाय वाड्या-वस्त्यांवरील गरीब, अल्पदूध उत्पादक यात भरडले जाणार आहेत. बरेचसे दूध उत्यादक अशिक्षित आहेत. मुळात हे बँकिंग सुविधेपासून वंचित आहेत. आताच खात्यावरून पैसे काढण्यासाठी स्लीप भरून घेण्यासाठी विनंत्या कराव्या लागतात. त्यांनी ए. टी.एम. कार्ड घेतले तरी त्यांना ते ऑपरेट करण्याचे ज्ञान नाही. शिवाय वाड्या-वस्त्यांवर बँकिंग सुविधा उपलब्ध नाही तर मग ए.टी.एम. सेंटरची सुविधा विचारायलाच नको. उदा. सांगारूळच्या पश्‍चिमेस असणार्‍या बारा वाड्यांसाठी केवळ आमशी मध्येच जिल्हा बँकेची शाखा आहे. किंवा सांगरूळातील महाराष्ट्र बँकेचा किंवा जिल्हा बँकेचा आधार घ्यावा लागेल; पण त्या ठिकाणीही अपुरा कर्मचारीवर्ग व खातेदारांची संख्या यामुळे सध्याच्या ग्राहकांना पुरेशी सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

या डोंगर-वस्त्यांवरील दूध उत्पादकांना दूध उत्पादन कमी असल्यामुळे ज्यांचे दहा दिवसांचे दुधाचे बिल 100 ते 150 रुपये असते. त्यातून पशुखाद्य उधारी वजा जाता 50 रुपयांच्या दूध बिलासाठी दिवसभराचा रोजगार बुडवून सहा सात मैलाची पायपीट करावी लागणार आहे. शिवाय बँक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे दूध संस्थेकडून दूध बिलाच्या याद्या बँकेला दिल्यावर खात्यावर रक्‍कम जमा होण्यासाठी चार दिवसांचा कालावधी जाणार आहे. सध्या ज्या दिवशी बिल आहे त्या दिवशीच दूध उत्पादक दूध घालायला आल्यावर जातानाच बिलाचे पैसे घेऊन जातात. दुर्गम भागात फार मोठा दूध व्यवसाय करणारे दूध उत्पादक नाहीत. 1 किंवा 2 जनावरांच्या जोरावर उदरनिर्वाह करणार्‍या गरीब दूध उत्पादकांची यामुळे कुचंबना होणार आहे. शिवाय खात्याने कारवाई करण्याची धमकी दिल्यामुळे सचिवही या आदेशास  संघटित विरोध करण्याच्या विचारात आहेत.