Fri, Feb 22, 2019 01:22होमपेज › Kolhapur › करवीर चे पोलिस करतात काय

करवीर चे पोलिस करतात काय

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 22 2018 12:52AMकुडित्रे : प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षांत कुंभी-कासारी परिसरात विशेषतः कारखाना कार्यस्थळावर तब्बल 17 चोर्‍या, दुकान, घरफोडीचे गुन्हे झाले. ज्वेलरीची दुकाने, दूध संस्था, गॅरेजेस यांना लक्ष्य करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तपास चालू आहे, यापलीकडे पोलिसांचे उत्तर नाही. त्यामुळे करवीरचे पोलिस करतात तरी काय? असा संतप्‍त सवाल विचारला जात आहे. 28 जुलै, 2012 रोजी सांगरूळ (ता. करवीर) येथे पोलिस औटपोस्टपासून केवळ पन्‍नास फूट अंतरावरील दोन दूध संस्था फोडून पावणेदोन लाखाची रोकड लंपास केली. त्याच रात्री सोन्या-चांदीचे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी याआधी कारखाना कार्यस्थळावरील ज्वेलर्सची दोन दुकाने लुटण्याचा प्रयत्न केला.

त्याच दिवशी दोनवडे (ता. करवीर) येथील सोन्या-चांदीचे दुकान फोडून 60 हजारांचा ऐवज लंपास केला, तीन मोटारसायकल्स पळवल्या. दोन पेट्रोल संपल्याने तिथंच टाकल्या व एक लंपास केली. याचा तपास केवळ  चालू आहे, यापुढे सरकलाच नाही.  पुढे 31 जानेवारी 2017 रोजी कोपार्डे (ता. करवीर) येथे सराफाचे दुकान व एक घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास केला. जाताना कारखान्याच्या अधिकार्‍याच्या दारात लावलेली मोटारसायकल पळवली. पुढे ती पेठवडगावच्या माळावर मिळाली, असे लोक सांगतात. विशेष म्हणजे, हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये बंदिस्त झाला. नेहमीप्रमाणे पोलिसांचा तपास सुरू आहे, यापलीकडे प्रगती नाही. शनिवारी दोन मोबाईल शॉपी फोडल्या. इतर प्रकरणांप्रमाणे या चोर्‍याही तपास चालू आहे, या सदरात मोडणार काय? याचे उत्तर नागरिक शोधत आहेत.