होमपेज › Kolhapur › करवीरमध्ये पुन्हा काँग्रेसची बाजी

करवीरमध्ये पुन्हा काँग्रेसची बाजी

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 12:28AM

बुकमार्क करा
कुडित्रे ः प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चार  ग्रामपंचायतीत सत्ता मिळवून पुन्हा काँग्रेसच नंबर वन असल्याचे सिद्ध झाले. बहुचर्चित शिरोली दुमाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्या पॅनेलने सर्व जागा जिंकून सत्ता राखली. करवीर तालुक्यातील करवीर विधानसभा मतदारसंघापैकी शिरोली दुमाला, वाशी, केकतवाडी आणि निटवडे व कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सांगवडेवाडी आणि चिंचवाड अशा सहा ग्रामपंचायतींसाठी  बुधवारी मतमोजणी झाली. चिंचवाड ः ना. मा. प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंचपदी महाडिक गटाचे सुदर्शन महावीर उपाध्ये हे सरपंच झाले. त्यांनी ओमराज मुजावर व शब्बीर मुजावर यांना पराभूत केले.

सदस्य ः प्रसाद सलगर, अश्‍विनी पाटील, कुमार आंबी, दादासोा पाटील, सुरेखा पाटील, प्रकाश पाटील, शकुंतला आंबी, बाबुराव कोळी, जमिला मुजावर, निखील पोवार, वंदना करुणासागर व सुमन जाधव. या ठिकाणी भटक्या विमुक्त जाती-जमाती सदस्य जागा रिक्त राहिली.  सांगवडेवाडी ः ना. मा.  प्रवर्ग महिला राखीव सरपंचपदी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील गटाच्या वैशाली शंकर वडर सरपंच झाल्या. त्यांनी सविता वडर यांचा पराभव केला. विजयी पॅनेलचे नेतृत्व कुमार खुडे यांनी तर विरोधी गटाचे नेतृत्व अशोक गणमाळे यांनी केले. शिरोली दुमाला ः या ग्रामपंचायतीत गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील व सरदार पाटील यांच्या संयुक्त आघाडीने सर्व जागा जिंकून सत्ता कायम राखली. कुंभी कासारीचे विद्यमान संचालक किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पॅनेलचा पराभव झाला. 

वाशी ः या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी-शिवसेना-भाजप व शेतकरी कामगार पक्षाच्या महाआघाडीने काँग्रेसची सत्ता उलथून टाकली. काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. केकतवाडी ः या ग्रामपंचायतीत स्थानिक आघाड्यांतच लढत झाली. शेतकरी सेवा व लोकसेवा विकास आघाडीने सरपंचपदासहीत सर्व जागा जिंकल्या. सरपंचपदी पंढरीनाथ महादेव नलवडे यांनी रेश्मा यादव यांना पराभूत केले.  निटवडे ः  काँग्रेसच्या सत्तारूढ ग्रामविकास आघाडीचे तुकाराम व्हरांबळे सरपंच झाले. त्यांनी विरोधी ममादेवी ग्रामविकास आघाडीचे किरण पाटील यांना पराभूत केले.