Wed, Mar 20, 2019 12:53होमपेज › Kolhapur › पोलिसांसमोरच मैदानात हुल्लडबाजी

पोलिसांसमोरच मैदानात हुल्लडबाजी

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 05 2018 12:49AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

सन 2017-18 च्या फुटबॉल हंगामाची सुरुवातच हुल्लडबाजीने झाल्याने तमाम फुटबॉलप्रेमींना उर्वरित स्पर्धांची चिंता लागून राहिली आहे. स्पर्धा सुरळीत होणार की हुल्लडबाजीमुळे बंद पडणार, असा सवाल निर्माण झाला आहे. ‘केएसए लीग’ स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यानंतर बक्षीस समारंभावेळी पोलिसांसमोरच मैदानात बिनधास्त हुल्लडबाजी सुरू होती. सामना संपल्यानंतर दोन्हीकडचे समर्थक आमने-सामने आल्याने मैदान व परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. 

दरम्यान, संपूर्णवेळ सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल केएसएच्या नियम क्रमांक 11 (इ) नुसार टॉसवर (नाणेफेक) करण्यात आला.  

यात पाटाकडील तालीम ‘अ’ संघ विजयी ठरला. यावर अक्षेप नोंदवत प्रॅक्टिसच्या समर्थकांनी बक्षीस समारंभावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. उपविजेतेपदाचा चषक आणि बक्षिसाची रक्कम प्रॅक्टिसच्या समर्थकांनी केएसएच्या कार्यालयात जाऊन ठेवली. काहींनी पाटाकडीलच्या समर्थकांच्या अश्‍लील घोषणांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. यामुळे वातावरण चिघळले. प्रेक्षक गॅलरीतून मिळेल त्या वस्तू फेकण्यात आल्या. अखेर पोलिसांनी या समर्थकाला ताब्यात घेतले. यामुळे दोन्हीकडचे समर्थक एकमेकांविरोधात उभे ठाकले. अखेर पोलिसांनी जादा कुमक मागवून सौम्य लाठीमार करून दोन्हीकडच्या समर्थकांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.  

पंच-खेळाडूंना अर्वाच्य शिवीगाळ, अश्‍लील घोषणा,  मैदानात बाटल्या, पेटते फटाके व चप्पलफेक, कपडे काढून नाचणे, दारू पिणे या व अशा हुल्लडबाजीनेच रविवारचा सामना गाजला. महत्त्वाचे म्हणजे ही सर्व हुल्लडबाजी केएसएने मैदानात जागोजागी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरासमोर सुरू होती. पोलिसांनीही हुल्लडबाजीचे चित्रण केले आहे.

 अंतिम सामना असल्याने मैदानात फुटबॉलप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. यात महिला, मुली, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता. रविवार सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने सहकुटुंब, सहपरिवार लोक मैदानात उपस्थित होते. यामुळे फुटबॉल महासंग्राम स्पर्धेनंतर मैदान खचाखच भरले होते. पाटाकडील व प्रॅक्टिसच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत फुटबॉलप्रेमींची मने जिंकली. मात्र, या संघांच्या समर्थकांनी केलेल्या हुल्लडबाजीने त्यांचा पुरता भ्रमनिरास केला.