Wed, May 22, 2019 22:31होमपेज › Kolhapur › ‘खंडोबा’ने ‘पाटाकडील’ला बरोबरीत रोखले

‘खंडोबा’ने ‘पाटाकडील’ला बरोबरीत रोखले

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 13 2018 12:02AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

केएसए लिग फुटबॉल स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघाचे कडवे आव्हान पेलत खंडोबा तालीम मंडळाने  1-1 असे बरोबरीत रोखले. महत्त्वाचे म्हणजे सामन्यातील पहिला गोल पूर्वार्धात खंडोबा तालीम मंडळाने केला. हा गोल फेडण्यासाठी पाटाकडीलला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. उत्तरार्धात गोल नोंदवून त्यांनी सामना 1-1 असा बरोबरीत आणला. यामुळे सामन्याची चुरस अधिकच वाढली. मात्र, दोन्ही संघांना पुन्हा आघाडी मिळविता आली नाही. 

छत्रपती शाहू स्टेडियमवर पीटीएम विरुद्ध खंडोबा यांच्यात महत्त्वपूर्ण लढत झाली. सामन्याच्या प्रारंभीपासूनच दोन्ही संघांकडून जलद खेळ आणि आक्रमक चढायांचा अवलंब करण्यात आला. पाटाकडीलकडून अक्षय मेथे-पाटील, ओंकार जाधव (कोल्हापूर) व ओंकार जाधव (गडहिंग्लज), ओंकार पाटील, ऋषभ ढेरे, रुकीम यांनी आघाडीसाठी प्रयत्न केले. मात्र, खंडोबाच्या भक्‍कम बचावामुळे त्यांना अपयश आले. बचावपटू विकी शिंदे गोलरक्षक रणवीर खालकर यांनी उत्कृष्ट रक्षण केले. खंडोबाकडून कपिल शिंदे-बालिंगकर, अर्जुन शेतगावकर, आशिष चव्हाण, सुधीर कोटी केला, रणवीर जाधव, सागर पोवार यांचे आघाडीसाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. 40 मिनिटांचा खेळ संपल्यानंतरच्या जादा वेळेत मिळालेल्या कॉर्नर किकवर रणवीर जाधवने उत्कृष्ट कॉर्नरवर थेट नेत्रदीपक गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 

उत्तरार्धात पीटीएमने गोल फेडण्यासाठी आक्रमक खेळाचा अवलंब केला. 45 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत खंडोबाच्या गोलक्षेत्रात त्यांच्या प्रतीक सावंतचा हँडबॉल झाल्याने मुख्य पंचांनी पीटीएमला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. यावर ऋषभ ढेरे याने बिनचूक गोल नोंदवत सामना 1-1 असा बरोबरीत केला. यानंतर सामन्याची चुरस अधिकच वाढली. दोन्ही संघांकडून गोलसाठी जोरदार चढाया झाल्या. खंडोबाकडून झालेल्या चढाया पीटीएमचे बचावपटू सैफ हकीम व गोलरक्षक विशाल नारायणपुरे यांनी रोखल्या. पीटीएमलाही दुसरा गोल करता आला नाही. यामुळे सामना बरोबरीत सुटला. 
आजचा सामना : शिवाजी तरुण मंडळ वि. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, सायंकाळी 4 वाजता.