Sun, May 26, 2019 09:36होमपेज › Kolhapur › ‘टॉस’वर ‘पाटाकडील’ चॅम्पियन

‘टॉस’वर ‘पाटाकडील’ चॅम्पियन

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 05 2018 12:46AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

केएसए लीग 2017-18 स्पर्धेत समान गुण आणि गोलफरकासह पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ आणि प्रॅक्टिस क्लब ‘अ’ संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. यामुळे स्पर्धेच्या अंतिम लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. रविवारी झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी मैदान फुटबॉलप्रेमींच्या गर्दीने खचाखच भरले होते. दोन्ही संघांकडून आपल्या नावलौकिकास साजेसा तुल्यबळ खेळ झाला; मात्र दोघांकडून एकही गोल न झाल्याने सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. यामुळे निकालासाठी प्रथमच ‘केएसए’च्या नियमानुसार ‘टॉस’ (नाणेफेक) करण्यात आला. यात पाटाकडील तालीम मंडळ भाग्यवान ठरले. निकाल त्यांच्या बाजूने लागल्याने यावर प्रॅक्टिसच्या समर्थकांनी जोरदार आक्षेप नोंदविला. त्यांनी बक्षीस समारंभावर बहिष्कार टाकला. त्यांनी उपविजेतेपदाचा चषक आणि बक्षिसाची रक्कम ‘केएसए’च्या कार्यालयात नेऊन जमा केली.

नेत्रदीपक खेळाने मने जिंकली

छत्रपती शाहू स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत प्रारंभीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळ झाला. योजनाबद्ध चाली रचत आघाडीसाठी प्रयत्न झाले. खोलवर चढायांबरोबरच भक्कम बचावाचा समन्वय दोन्ही संघांनी साधला. प्रॅक्टिसकडून राहुल पाटील, सुशील सावंत, प्रथमेश यादव, माणिक पाटील, तेजस शिंदे, फ्रान्सीस, अभिजित शिंदे यांनी आघाडीसाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. पाटाकडीलकडून हृषीकेश मेथे-पाटील, अक्षय मेथे-पाटील, ओमकार जाधव, सैफ हकीम यांनी गोलसाठी केलेल्या प्रयत्नांना अपयश आले. दोन्ही संघांच्या गोलरक्षकांनी उत्कृष्ट बचाव केला. यामुळे सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. 

टॉसबद्दल आक्षेप

संपूर्णवेळ सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने ‘केएसए’च्या नियम क्रमांक 11 (इ) नुसार सामन्याचा निकाल ‘टॉस’वर (नाणेफक) करण्यात आला. ‘एआयएफएफ’चे जनरल सेक्रेटरी कुशल दास यांच्या हस्ते टॉस करण्यात आला. यात पाटाकडील तालमीच्या बाजूने निकाल लागला. यामुळे त्यांच्या समर्थकांनी मैदानात प्रचंड जल्लोष केला; मात्र प्रॅक्टिसच्या समर्थकांनी टॉस व्यवस्थित झालाच नसल्याचा आक्षेप घेतला.

...आणि तणाव चिघळला

टॉसचा निर्णय अमान्य करत काही समर्थकांनी मैदानात सुरू असणारा बक्षीस समारंभ थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर व त्यांच्या सहकार्‍यांनी पाठलाग करून पकडले. यावेळी काहींना काठ्यांचा प्रसादही खावा लागला. पकडलेल्या समर्थकांना मैदानाबाहेर नेत असताना  पाटाकडीलच्या समर्थकांनी अश्‍लील घोषणाबाजी केली. यामुळे अधिकच चिडलेल्या प्रॅक्टिसच्या एका समर्थकाने त्यांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देत अश्‍लील हवभाव केले. यामुळे मैदानातील तणाव चिघळला. पाटाकडीलच्या समर्थकांनी प्रॅक्टिसच्या त्या समर्थकाला प्रचंड शिवीगाळ करून बाटल्या, चप्पल, फटाके आणि हाताला मिळेल त्या वस्तू त्याच्या दिशेने भिरकावल्या. पोलिस व प्रॅक्टिसच्या संघव्यवस्थापकांनी तातडीने त्या समर्थकाला तेथून बाजूला नेले. 
दरम्यान, मैदानाबाहेर प्रॅक्टिसचे समर्थक एकत्रित आले. त्यांनी ‘केएसए’च्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांनी त्यापैकी प्रमुखांना ताब्यात घेतले व इतर समर्थकांना पांगविण्यात आले. यानंतर प्रॅक्टिसच्या काही समर्थकांनी उपविजेतेपदाचा चषक व 35 हजार रुपयांची रक्कम ‘केएसए’च्या कार्यालयात नेऊन जमा केली. दरम्यान, छत्रपती शाहू स्टेडियम, पाटाकडील तालीम  व प्रॅक्टिस क्लब परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.