Tue, Jul 23, 2019 18:53होमपेज › Kolhapur › परिवहन सभापतिपद पुन्हा शिवसेनेलाच

परिवहन सभापतिपद पुन्हा शिवसेनेलाच

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:31AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : सतीश सरीकर

कोल्हापूर महापालिकेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे काठावरचे बहुमत असल्याने अवघे चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेला राजकारणात डीमांड आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे एकमेव महत्त्वाचे मत मिळविण्यासाठी शिवसेनेला पुन्हा परिवहन समिती सभापतिपद बहाल केले जाणार आहे. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीला नामोहरम करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा शिवसेनेला सोबतीला घेण्याचे ठरविले आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 44, तर भाजप-ताराराणी आघाडीकडे 33 इतके संख्याबळ झाले. सत्ता स्थापन करण्यासाठी हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत संख्येचा फरक असल्याने भाजप-ताराराणी आघाडीने शिवसेनेला आपल्याकडे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले; परंतु केंद्रात व राज्यात भाजप-शिवसेना एकत्र असूनही कोल्हापूर महापालिकेत हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकलेले नाहीत. परिणामी, सर्वाधिक जागा मिळविणार्‍या काँग्रेसने समविचारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करून महापालिकेत सत्ता काबीज केली. असे असले तरी अवघे चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेला महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत मोल प्राप्त होते. 

महापालिकेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात प्रचंड ईर्षेचे राजकारण आहे. हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत नगरसेवकांचा फरक असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने गेल्या वर्षी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली होती. स्थायी निवडणुकीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला अक्षरशः घाम फोडला, ही वस्तुस्तिती आहे. यापुढील निवडणुकीत आता कोणतीही रिस्क नको म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थायी सभापतिपदासाठी मेघा पाटील व पिरजादे यांच्यात चुरस

काँग्रेस-राष्ट्रवादीतील सत्तेच्या वाटणीनुसार पुढील स्थायी समिती सभापतिपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. राष्ट्रवादीतून अफजल पिरजादे, मेघा पाटील व अजिंक्य चव्हाण हे तीन सदस्य आहेत. चव्हाण यांनी प्राथमिक शिक्षण मंडळ सभापतिपद भूषविले आहे. पिरजादे हे छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाचे सभापती आहेत. मेघा पाटील या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नूषा आहेत. सभापतिपदासाठी पिरजादे व पाटील इच्छुक आहेत. महापालिका इतिहासात पहिली महिला सभापती बनण्यासाठी पक्षाने संधी द्यावी, अशी पाटील यांची मागणी आहे; परंतु स्थायीतील सर्व नगरसेवकांचा पाठिंबा असल्याने आपल्यालाच सभापतिपद मिळावे, म्हणून पिरजादे आग्रही आहेत. 

‘स्थायी’साठीकाँग्रेसमध्ये फिल्डिंग

स्थायी समितीतून निवृत्त झालेल्या काँग्रेसचेच सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे सर्व सदस्य आहे तेच राहणार आहेत. परिणामी, काँग्रेसमधून इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यात भूपाल शेटे, शोभा कवाळे, संजय मोहिते, प्रतीक्षा पाटील, माधुरी लाड, प्रताप जाधव आदींचा यात समावेश आहे. 

नेतेच नावे ठरवणार  : सत्यजित कदम

गेल्या दोन वर्षांत भाजप व ताराराणी आघाडीतील कोणकोणत्या नगरसेवकाला कोणकोणत्या समितीत सदस्य म्हणून पाठविले, कोणाला कोणते पद मिळाले आदीबाबतचा सर्व अहवाल नेत्यांनी मागितला आहे. त्यानुसार त्यांना दोन दिवसांत सर्व नगरसेवकांबाबतचा अहवाल देणार आहे. त्यानंतर नेतेच स्थायी समितीसह इतर समितींतील सदस्यांची नावे ठरवतील, असे ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम यांनी सांगितले.