Thu, Jul 18, 2019 14:26होमपेज › Kolhapur › दलित वस्ती सुधारण्यासाठी बक्षिसे देणार

दलित वस्ती सुधारण्यासाठी बक्षिसे देणार

Published On: Dec 09 2017 12:28AM | Last Updated: Dec 09 2017 12:28AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

दलित उद्धारक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने शाहू सम्यक विकास वस्ती योजना जिल्हा परिषदेने जाहीर केली आहे. आदर्श दलित वस्तीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर तब्बल 31 लाखांची बक्षिसे देणार्‍या या योजनेवर शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अधिकृत शिक्‍कामोर्तब झाले. अशाप्रकारे स्पर्धा घेणारी कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात एकमेव ठरली असून याबद्दल समाजकल्याण सभापती, अधिकार्‍यांचे स्थायी सभेत विशेष अभिनंदन करण्यात आले. विशेष म्हणून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी देखील या योजनेचे कौतुक केले आहे. अशी माहिती जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक व सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी संयुक्‍त पत्रकार बैठकीत दिली.

जि. प. च्या 20 टक्के व पंचायत समितीच्या 15 टक्के राखीव निधीतून ही योजना घेतली जाणार आहे. 1 जानेवारीपासून सुरू होणार्‍या योजनेतील सहभागींना 14 एप्रिलला पुरस्काराने गौरवले जाणार आहे. तालुकास्तरावरून प्रत्येकी 3 याप्रमाणे 36 तर व जिल्हास्तरावरून 3 असे 39 जणांना पुरस्काराने गौरवले जाणार आहे. तालुकास्तरासाठी 1 लाख, 75 हजार, 50 हजार अशी बक्षिसांची रक्‍कम असणार आहे. त्यासाठी 27 लाख रुपये लागणार आहेत. जिल्हास्तरासाठी  पावनेदोन लाख, दीड लाख, सव्वा लाख रुपये अशी बक्षीस रक्‍कम असणार आहे. त्यासाठी 4 लाख 50 हजार रुपयांची रक्‍कम राखून ठेवली जाणार आहे. 

स्थायी समितीच्या बैठकीत आरोग्य विभागातर्फे नावीन्यपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये नवजात शिशूंना बेबी कीट दिले जाणार आहे. तसेच 10 पटाखालील शाळांच्याबाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे ठरले. शासनाकडून आलेल्या यादीत जिल्ह्यातील 34 शाळांचा समावेश असला तरी यातील 7 शाळांपैकी 4 शाळांचे आधीच समायोजित केल्या आहेत. तीन शाळा बंदच आहेत. उर्वरित 27 मध्येही तीन किलोमीटरच्या अंतराची अट आणि पटसंख्याची पुन्हा पडताळणी करून वस्तूस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. या साधारणपणे द्विशिक्षकी शाळा असल्याने यातून अतिरिक्‍त होणार्‍या शिक्षकांचेही समायोजन केले जाणार आहे, असे अध्यक्षा महाडिक यांनी सांगितले.