Tue, Jul 16, 2019 10:08होमपेज › Kolhapur › सत्ताधारी बिथरलेले, विरोधक विखुरलेले

सत्ताधारी बिथरलेले, विरोधक विखुरलेले

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 12:11AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : नसिम सनदी 

जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेची नव्याची नवलाई नवव्या महिन्यातच संपली आहे. निधी नसल्याने मतदारसंघात तोंड दाखवायची जागा राहिलेली नाही, हे विरोधकांसह सत्ताधारीही मान्य करतात. पण पोपट मेला आहे, हे राजाला सांगायचे कुणी म्हणून पोपट कसा बरा आहे, हे सांगण्यात मात्र ते मश्गूल आहेत. हा असंतोष एकवटण्याची संधी असतानाही विरोधकांना टायमिंग साधता आले नाही. सर्वसाधारण सभेत सत्ताधारी बिथरलेले आणि विरोधक विखुरलेले असे चित्र दिसले. केंद्र व राज्य सरकारच्या मुद्द्यावरून खडाजंगी उडवून ग्रामीण विकासाच्या मुद्द्याला जाणीवपूर्वक बगल दिली गेली. त्यामुळे हे सभागृह ग्रामीण जनतेचे की विधानसभा, लोकसभेचे असा प्रश्‍न पडला. 

सर्वसाधारण सभेत विरोधी काँग्रेस सदस्यांनी सरकारच्या धोरणावर टिकास्त्र सोडले, यावरुन सत्ताधारी विशेषता भाजप सदस्यांनी काँग्रेसच्या सदस्यांवर तोंडसुख घेतले. मुळातच जिल्हा परिषदेचे सभागृह हे ग्रामीण जनतेच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीचे व्यासपीठ असतानाही याचा राजकीय आखाडा झाला. यानिमित्ताने भाजप सदस्यांत सरकारी प्रेमाचा राग आळवून निष्ठेचे दर्शन घडवण्याची स्पर्धा लागली. सभागृहाच्या लौकीकाचे आणि जनतेच्या समस्यांचे भान न ठेवता पक्ष निष्ठेवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये ताणाताणी झाली. शिक्षण सभापतींच्या पालकमंत्र्यांविषयी उफाळलेल्या प्रेमावरूनही विरोधी सदस्यांबरोबर सभागृहात खडाखडी झाली. 

जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, प्राथमिक आरोग्य व पशुवैद्यकीय केंद्रात डॉक्टर नाहीत, शाळा दुरुस्ती नसल्याने कधी भिंती पडतील, कौले अंगावर पडतील याची शाश्‍वती नाही, दुर्गम भागातील शाळा बंद पडत आहेत, वैयक्‍तिक लाभार्थ्यांना फॉर्मपलिकडे काही मिळालेले नाही, वर्षभरात एक पैशाचा निधी नाही की नवीन भरती नाही, कारवायांनाही न जुमानण्याची मानसिकता अधिकारी, कर्मचारीवर्गात बळावली आहे, साधा ग्रामसेवक लोकांनाच काय अधिकार्‍यांनाही जुमानेसा झाला आहे, अशी सर्व परिस्थिती असतानाही सभागृहात फुटकळ चर्चेपलीकडे ठोस चर्चा होत नाही. सत्ताधार्‍यांनाही हे सगळे कळते; पण सांगायचे कुणाला असा त्यांच्यासमोरील प्रश्‍न आहे. विरोधी सदस्यांनी हे उचलून धरायचे तर त्यांच्यात कुणाचा पायपोस कुणाला नाही अशी परिस्थिती. विरोधकांनी नेमलेले विरोधी पक्षनेतेच सध्या जिल्हा परिषदेत फिरकत नाहीत. सभेलाही येण्याचे टाळतात, पक्षाचे नेतेही पाठबळ देत नाहीत. मग कुणाच्या जीवावर सभागृहात आवाज उठवायचा, अशा संभ्रमात विरोधी सदस्य आहेत.

सत्ताधार्‍यांत वादळापूर्वीची शांतता

सर्वसाधारण सभेपूर्वी सत्ताधार्‍यांच्या झालेल्या पार्टी मिटिंगमध्ये  सत्ताधारी सदस्यांमध्ये प्रचंड धुसफूस झाली आहे. निधी देण्याच्या अटीवरच सभागृहात शांत राहण्याचे धोरण ठरले; पण ही शांतता वादळापूर्वीची असल्याचे काही सदस्यांनी निर्वाणीचा इशारा देऊन सांगितले आहे. विरोधी सदस्यांनीही पार्टी मिटिंग घेण्याचा प्रयत्न केला; पण तीन चार सदस्यांचा अपवाद वगळता कुणीही फिरकले नाही. सदस्यांनी जर तरची भाषा वापरल्याने जिल्हा परिषदेतील विद्यमान सत्ताधार्‍यांसाठी येणारा काळ कसोटीचा ठरणार आहे. 

बड्या नेत्यांचे मौन

यंदाच्या सभागृहात जिल्ह्यातील मातब्बर आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असणार्‍या सदस्यांची सत्ताधारी आणि विरोधी गोटातही संख्या मोठी आहे. या अनुभवी सदस्यांनी आपल्या जि.प. सभागृहातील यापूर्वीच्या अनुभवाच्या जोरावर अभ्यासपूर्ण मांडणी करावी, नवख्या सदस्यांना दिशा दाखवावी, भरकटत असणार्‍या सभागृहाला शिस्त लावावी अशी अपेक्षा आहे; पण या मातब्बर सदस्यांकडून सभागृहात किरकोळ अपवाद वगळता ब्र शब्दही काढला जात नाही.