Wed, Mar 27, 2019 03:57होमपेज › Kolhapur › सरकारवरील टीकेवरून भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य भिडले

सरकारवरील टीकेवरून भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य भिडले

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 13 2017 12:43AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

फडणवीस व मोदी सरकारवर टीका करण्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य परस्परांना भिडले. दोन्ही बाजूंकडील सदस्यांत शाब्दिक बाचाबाची झाल्याने गोंधळ उडाला. अध्यक्षा शौमिका महाडिक व उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी हे राजकीय व्यासपीठ नाही, जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्‍नावर भांडा, अशा कठोर शब्दात सुनावल्यानंतर वातावरण शांत झाले. 

‘सरकार मजेत मस्त, जनता महागाई, नवनव्या घोषणांनी त्रस्त, जीएसटीची सर्वत्र गस्त, कर्जमाफीचे नुसतेच दस्त, शेतकरी होताहेत आत्महत्याग्रस्त, मुख्यमंत्री साहेब आता तुम्हीच सांगा जगायचं तरी कसं’ अशा आशयाचे पोस्टर आणि पाठीवर रिकाम्या तिजोरीचे चित्र लावून आलेले काँग्रेसचे सदस्य भगवान पाटील यांनी सरकारच्या धोरणांचा खरपूस  समाचार घेतला. याला आक्षेप घेत भाजपचे विजय भोजे यांनी आमची तिजोरी रिकामी नाही, पुढल्या सभेत भरपूर निधी येणार आहे. काँग्रेसवाल्यांचा गैरसमज झालाय, अशी खोचक टिपणी केली. याला भाजपचेच अरुण इंगवले यांनीही नागपूर अधिवेशनानंतर निधी येणार आहे. नाही आला तर आपण सगळे मिळून पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू, असे सांगितले.  

प्रसाद खोबरे व अशोक माने हे भाजपचे सदस्यही आक्रमक झाले. याचवेळी विरोधी सदस्यांतून सतीश पाटील, मनोज फराकटे, बजरंग पाटील, युवराज पाटील यांनीही आवाज वाढवल्याने सभागृहाला आखाड्याचे स्वरूप आले. अखेर उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी राजकारण बंद करा, खाली बसा असा दम भरल्यानंतर सभागृह शांत झाले.