Sun, Aug 18, 2019 14:25होमपेज › Kolhapur › माजी उपाध्यक्षांच्या गाडीची हवा सोडली

माजी उपाध्यक्षांच्या गाडीची हवा सोडली

Published On: Apr 14 2018 1:42AM | Last Updated: Apr 14 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मुख्यालयासमोरचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ केला असतानाही आणि त्याचे पालन अध्यक्ष, सीईओंपासून सर्वच  लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी करत असतानाही त्याचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या गाडीची हवाच सोडण्याची कडक कारवाई झाली. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास खुद्द अध्यक्ष शौमिका महाडिक यांनीच हे आदेश देऊन कारवाई केली. यावरून अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष व उपस्थित सदस्य, पदाधिकारी यांच्यात वाद झाला. अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर सोमवारी यासंदर्भात अध्यक्षांच्या दालनात बैठक घेण्याचे निश्‍चित झाले. 

मुख्यालयासमोर वाहनांची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी वर्षभरापूर्वी नो पार्किंगची प्रशासनाने मांडलेली सूचना अध्यक्षांनी मान्य करत सभागृहातच त्याला मंजुरी घेतली. त्यानुसार गाडी मुख्यालयात न थांबवता कागलकर हाऊससमोरील पार्किंगमध्ये लावायची आहे; पण गेल्या पंधरा दिवसांपासून माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांची गाडी मुख्यालयात लागत होती. याबद्दल त्यांना वारंवार सूचनाही केल्या होत्या; पण त्यांनी जुमानले नव्हते. यावरून तक्रारीही झाल्या. शुक्रवारीदेखील दुपारी अशीच गाडी त्यांनी लावली. अध्यक्ष महाडिक यांनी गाडीच्या चारही चाकांची हवा सोडण्याच्या सूचना शिपायाला दिल्या. 

हवा सोडल्यानंतर तातडीने खोत तिथे दाखल झाले. यावरून महाडिक व खोत यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. सीईओंच्या परवानगीनेच गाडी लावली असल्याचा प्रतिवाद खोत यांनी केला. यावर चिडलेल्या महाडिक यांनी सीईओंना बोलावून घेत विचारणा केली. सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी आपण परवानगी दिलेली नाही. पार्किंगच्या बाबतीत त्यांनी आपल्याकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यात आपल्या गाडीला जि.प.ने ड्रायव्हर द्यावा, अशी मागणी केल्याचे सांगितले. ही मागणी पुरवणे शक्य नसल्याचे ड्रायव्हर संघटनेनेही कळवले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बांधकाम सभापती सर्जेराव पेरीडकर, सदस्य राजवर्धन निंबाळकर, विजय बोरगे, प्रकाश टोणपे यांनी अध्यक्षांची बाजू घेऊन सर्वांनी नियम पाळायचा हवा असे सांगितले. यावरून वाद वाढला. प्रशासनानेच सोमवारी अध्यक्षांच्या दालनात बैठक घेऊ, असे सांगून विषय संपवला; पण या प्रकरणाची जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा सुरू होती. 

दक्षिणेच्या राजकारणाची जि.प.मध्ये ठिणगी

कोल्हापूर दक्षिणमध्ये आमदार सतेज पाटील व आमदार अमल महाडिक यांच्यातील खड्या वादाचे पडसाद जि.प.तही उमटू लागले आहे. गाडीची हवा सोडण्याच्या प्रकरणाशी एकमेकांवरील कुरघोडीच कारणीभूत असल्याची चर्चा जि.प.मध्ये सुरू होती. 

ड्रायव्हरच नाहीत, तर द्यायचे कुठले 
खोत यांनी ड्रायव्हर देण्याची मागणी केली असली, तरी प्रत्यक्षात जि.प.कडे ड्रायव्हरच उपलब्ध नाहीत. 137 पदे मंजूर असताना केवळ 71 कार्यरत आहेत. 66 पदे रिक्त आहेत. ड्रायव्हर भरती होत नसल्याने 11 गाड्या ड्रायव्हरसह भाड्याने घेतल्या आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या गाडीसह ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील 9 उपविभाग, एनआरएचएमच्या एका गाडीचा समावेश आहे. ड्रायव्हरच नाहीत तर द्यायचे कुठले, आणि तरीही अ‍ॅडजेस्टमेंट केली तरी खासगी गाडीच्या सुरक्षेची जबाबदारी ड्रायव्हर कसा घेणार, असाही प्रश्‍न आहे.