Wed, Jul 24, 2019 12:16होमपेज › Kolhapur › 25 लाखांच्या फाईलला ‘प्रभारी’ने दिली मंजुरी?

25 लाखांच्या फाईलला ‘प्रभारी’ने दिली मंजुरी?

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 23 2018 12:39AMकोल्हापूर : विकास कांबळे

जिल्हा परिषदेत नावीन्य पूर्ण योजनेखालील 25 लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यास तत्कालीन अधिकार्‍यांनी सही करण्यास नकार दिला. त्यामुळे अध्यक्ष कार्यालयाने त्यावर ‘प्रभारी’ अधिकार्‍यांची सही घेऊन फाईल मंजूर करून घेतल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे.

राजकारणाची पाठशाला म्हणून ओळखण्यात येणार्‍या जिल्हा परिषदेला पूर्वी शासनाकडून प्रचंड निधी येत असे. शासनाची कोणतीही योजना जाहीर झाली की त्यासाठी मंजूर होणारा निधी प्रथम जिल्हा परिषदेत यायचा. तेथून तो पंचायत समितीमार्फत गावपातळीवर वितरित केला जायचा. अलीकडील काळात मात्र जिल्हा परिषदेचे अधिकार दिवसेंदिवस कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीऐवजी शासनाने  ग्रामपंचायतींना केंद्रबिंदू मानले आहे. त्यामुळे त्या अधिक कशा सक्षम होतील यासाठी शासनाने गेल्या दहा वर्षांपासून ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त अधिकार देऊन त्यांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने थेट निधी ग्रामपंचायतींना पाठविण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम जिल्हा परिषदेला मिळणार्‍या निधीवर झाला. त्यामुळे नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या नावाखाली जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निधीसाठी प्रयत्न करू लागले. असाच एक नावीन्यपूर्ण उपक्रम आरोग्य विभागाच्या सहकार्याने सध्या जिल्हा परिषदेत राबविण्यात येत आहे. यासाठी 25 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

या आरोग्य उपक्रमात सहा शिबिर भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी येणार्‍या डॉक्टरांना व सहायक तंत्रज्ञानांना मानधन म्हणून 40 हजार रुपये, प्रयोगशाळा तपासण्यासाठी अडीच लाख खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षण करण्यासाठी आशा स्वयंसेविका व एमएसडब्ल्यू झालेल्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांनी 50 घरांना भेटी दिल्या की त्यांना 200 रुपये मानधन देण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्यासाठीचा खर्च साधारण पावणेतीन लाख रुपये खर्च अपेक्षित दाखविण्यात आला आहे. या खर्चाच्या मंजुरीसाठी तत्कालीन अधिकार्‍यांकडे फाईल सादर करण्यात आली होती, मात्र ही फाईल त्यांनी मंजूर केली नसल्याचे समजते. त्यावर त्यांनी चर्चा म्हणून शेरा मारला होता. ही फाईल मंजूर करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते, पण त्या अधिकार्‍यांनी त्यांना फारशी दाद दिली नाही.