Tue, Aug 20, 2019 04:58होमपेज › Kolhapur › औषध घोटाळ्यावर पांघरूण टाकण्याचा डाव

औषध घोटाळ्यावर पांघरूण टाकण्याचा डाव

Published On: Mar 12 2018 1:31AM | Last Updated: Mar 11 2018 9:48PMकोल्हापूर: नसिम सनदी 

औषध घोटाळा कुणी, कुणाच्या सांगण्यावरून केला, कुणाला किती वाटा पोहच झाला याच्या मुळापर्यंत जाण्याची संधी आली असताना सदस्यांनी सर्वसाधारण सभेत पोकळ चर्चा करून दोन तास नुसतीच तोंडाची हवा घालवली. समोर आलेल्या दोन घोटाळेबाजांना कडक शिक्षा देण्याबरोबर पडद्यामागचे खरे सुत्रधार शोधण्याऐवजी ज्यांनी ताकदीने घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळल्या त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची आगळीक सदस्यांकडून घडली. 

पडद्यामागच्या सूत्रधारांना वाचवण्याची दक्षताही घेतली गेली. त्यामुळे दोन तासांच्या चर्चेनंतरही काहीच ठोस हातात आले नाही. ना चौकशी समिती स्थापन झाली, ना कारवाई झाली, ना पडद्यामागील इतर सहभागींच्या चौकशीचा निर्णय झाला. फेरचौकशीच्या फेर्‍यात अडकवून तीव्रता कमी करून पांघरूण टाकण्याचाच प्रयत्न झाला.

जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या 16 लाखांच्या औषध खरेदी घोटाळ्याचे पडसाद शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत उमटले; पण हे उमटू नयेत यासाठी गेल्या आठ दिवसांपासून फिल्डिंग लावली जात होती. विषय चर्चेला येऊ नये, आला तर धोरणात्मक निर्णय होऊ नये  यासाठी विशेष यंत्रणाही लावण्यात आली होती. अधिकारी, कर्मचार्‍यांसह काही लोकप्रतिनिधींचाही यात सहभाग असल्याचे निष्पन्‍न झाल्यानंतर तर ही यंत्रणा खूपच सावध झाली होती. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांतील काही सदस्य यात सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर तर इतर सदस्य आक्रमक होतील, अशी अपेक्षा होती; पण ‘तेरी चूप मेरी भी चूप’ असेच सदस्यांचे धोरण राहिले. कशाला उगीचच कुणाला अंगावर घ्या या भावनेतून साप साप म्हणत उगीचच भूई बडवण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. 

घोटाळ्यातील उघड झालेल्या दोन अधिकार्‍यांपेक्षा घोटाळा घडवून आणण्यातील खरे सुत्रधार उघड  होणे गरजेचे होते; पण त्यांच्यावर पांघरूण टाकले गेले. ज्यांच्या कडक भूमिकेमुळे घोटाळा समोर आला, कारवाई सुरू झाली त्या सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांच्यावरच आगपाखड झाली. डिसेंबर ते फेब्रुवारी दोन महिने  हा घोटाळा दडवून ठेवला जात होता. ज्यांना आरोपी केले गेले त्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी तर हे बाहेरच येऊ नये यासाठीची सर्व जोडणी करून ठेवली होती. औषध भांडाराची किरकोळ चौकशी असल्याचे सांगत सत्य बाहेर येऊ नये, याची दक्षता घेतली होती; पण याची कुणकुण काही सदस्यांना लागल्यानंतर औषध निर्माण अधिकार्‍यांना हाताशी धरून आपले साधून घेतल्याची चर्चा आहे. 

सीईओंनी डाव उलटवला
या सर्व प्रकरणाचा घटनाक्रम सीईओंच्या कानावर गेल्यावर त्यांनी तातडीने चौकशी अहवाल मागवून घेतला. हा घोटाळा दोन अधिकार्‍यांपुरता सिमित नसल्याचे लक्षात आल्यानंतर तर त्यांनी पाळेमुळे खोदून काढण्यास सुरुवात केली. चौकशी अहवालाची छाननी सुरू केल्यानंतर वेगळेच सत्य बाहेर येऊ लागले. अहवालातच न अडकता आरोग्य व वित्त विभागात ज्यांच्या ज्यांच्या हातातून ही फाईल गेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी यात हातभार लावला आहे, त्या सर्वांची साखळीच त्यांनी जोडण्यास सुरुवात केली. वित्त विभागात अनेकांचे लागेबांधे आहेत. साखळी जुळली तर हे लागेबांधे उघड होतील या भीतीने विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी सदस्यांशी संधान साधत सभागृहात सीईओंनाच घेरण्याची रणनीती आखली. सभागृहात त्यांना टार्गेट करून सदस्यांनी हे दाखवूनही दिले; पण सीईओंनीही आक्रमक भूमिका घेत हा सर्व डाव परतवून लावला.