होमपेज › Kolhapur › चर्चा बदलाची; हवा खुशीची...

चर्चा बदलाची; हवा खुशीची...

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 1:03AMकोल्हापूर : विकास कांबळे

जिल्हा परिषदेतील अध्यक्ष बदलाबाबत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच केलेले वक्तव्य आणि त्यानंतर चोवीस तासांत महिला व बाल कल्याण समिती सभापतींनी दिलेल्या राजीनामाम्यामुळे इच्छुकाच्या चेहर्‍यांवर पुन्हा एकदा हास्य फुलू लागले आहे. या घटनांमुळे पदाधिकारी बदलाची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाची चर्चा गेल्या दीड, दोन महिन्यांपासून सुरू आहे. यावर नेत्यांच्या बैठका झाल्या. मात्र, पदाधिकारी बदलावर काही एकमत होत नव्हते. त्यानंतर अध्यक्ष वगळून केवळ सभापतींचे राजीनामे घेण्याबाबत चर्चा झाल्याचे सजमते. विविध पक्षांचे सदस्य सभापती असल्याने पहिला राजीनामा कोणी आणि कोणत्या पदाचा राजीनामा द्यायचा, यावर खल सुरू झाला. प्रत्येक सभापती एकमेकांकडे बोट दाखवू लागला. काही सभापतींनी तर अगोदर अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, अशीच भूमिका घेतली. आघाडीमध्ये पदाधिकारी बदलाबाबत, अशी परिस्थिती असतानाच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाचे थेट भाजपला आव्हान दिले. त्यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बदलावेत आम्ही देखील तयारीत असल्याचे एका कार्यक्रमात जाहीर केल्याने जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचे वातवरण काही काळ शांत झाले होते.

पदाधिकारी निवडताना अध्यक्षपदासाठी सौ. शौमिका महाडिक यांच्या बरोबरच ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांचे नाव आघाडीवर होते. इंगवले मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे हातकणंगले तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते. जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांना भाजपमध्ये घेतले. पक्षात घेत असताना भाजपच्या नेत्यांनी त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष अध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता असे बोलले जाते. अध्यक्षपदासाठी दोघेही आग्रही राहिल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी अध्यक्षपदाची खांडोळी करण्यात आली. सव्वा वर्षानंतर पदाधिकारी बदलण्याचे ठरविण्यात आले. दुसर्‍या सव्वा वर्षात इंगवले यांना संधी देण्याचे ठरले होते असे समजते. सव्वा वर्षानंतर जेव्हा पदाधिकारी बदलाची चर्चा सुरू झाली तेव्हा राजीनाम्याबाबत फारसे कोणी इच्छुक नसल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वच नेत्यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले. महिला व बाल कल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे यांचा एकमेव राजीनामा असणार, हे काही दिवसांपूर्वी निश्‍चित झाले होते.

पदाधिकारी बदलाची चर्चा थांबली असतानाच मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांनी अरुण इंगवले यांना अध्यक्ष करणारच, असे वक्तव्य करून विद्यमान अध्यक्षांना बदलण्याचे संकेत दिले. अध्यक्ष वगळून अन्य पदाधिकारी बदलण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूचित केले होते. आता अध्यक्षच बदलणार असल्याचे जाहीर केल्यामुळे पुन्हा एकदा पदाधिकारी बदलाचे वारे जिल्हा परिषदेत वाहू लागल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, त्या कितपत टिकून राहतील हे सध्यातरी सांगणे कठीण आहे.