Mon, Jun 24, 2019 21:01होमपेज › Kolhapur › जि.प. अध्यक्ष बदलणार नाही

जि.प. अध्यक्ष बदलणार नाही

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 29 2018 12:41AMकोल्हापूर : विकास कांबळे

जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाची केवळ चर्चाच ठरली आहे. सौ. शौमिका महाडिक यांचा राजीनामा घेऊन ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांना संधी देण्याची भाजप नेत्यांनी केलेली घोषणा स्वत:च मागे घेतली आहे. त्यामुळे सौ. महाडिक या अध्यक्षपदावर कायम राहणार असून  इच्छुक असलेले इंगवले यांना पुन्हा वेटिंगवरच राहण्याची वेळ आली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेेेल्या नेत्यांच्या बैठकीतील चर्चेनुसार महिला व बालकल्याण समिती सभापतींचा राजीनामा दिला आहे. या बैठकीत ज्यांना पदाधिकारी बदल करावयाचे असतील, त्यांनी करावेत. अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाकडे आहे. अध्यक्ष बदलण्याचा पक्षाचा कोणताही विचार नाही, असे  पक्षाचे नेते आ. सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. 

महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ. शुभांगी शिंदे यांचा राजीनामा घेतल्यानंतर पुन्हा एकदा अध्यक्षपद, तसेच अन्य सभापतिपदांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. आ. हाळवणकर यांच्या स्पष्टीकरणामुळे अडीच वर्षांचा कार्यकाल संपेपर्यंत अध्यक्षपदी सौ. महाडिक याच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसला सत्तेपासून बाजूला ठेवण्यात पालकमंत्री पाटील यांच्याबरोबर आ. हाळवणकर यांचा मोठा वाटा आहे. अन्य पक्षांची मोट बांधताना त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. त्यामुळे जि.प. राजकारणात ना. पाटील अंतिम निर्णय घेत असले, तरी निर्णय प्रक्रियेत हाळवणकर यांचीही भूमिका महत्त्वाची असते. जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेविषयी हाळवणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषेदत सत्ता स्थापन करताना ज्या पक्षांना सोबत घेतले, त्या पक्षांच्या नेत्यांची काही दिवसांपूर्वी बैठक बोलाविली होती.  बैठकीस जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे, शिवसेनेचे आ. चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना व आवाडे गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत पदाधिकारी बदलाबाबत चर्चा झाली. पदाधिकारी बदलाचा कार्यकाल सव्वा वर्षाचा निश्‍चित केला असला, तरी त्यानंतर पदाधिकारी बदलण्याचा निर्णय संबंधित नेत्यांनी घ्यावा, असे सांगण्यात आले. यावेळी सत्ता स्थापन करत असताना दोन समित्या जनसुराज्य शक्‍ती पक्षाला देण्यात आल्या आहेत. त्यांचे सभापती बदलण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा. शिवसेनेच्या नेत्यांनाही तुम्ही चर्चा करून निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले होते. महिला व बाल कल्याण समिती मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना व आवाडे गटाला देण्यात आली आहे. सव्वा वर्ष झाल्यानंतर या गटात चर्चा होऊन सभापती सौ. शिंदे यांचा राजीनामा घेण्यात आला. अध्यक्षपद भाजपकडे आहे. त्यामुळे अध्यक्ष बदलण्याचा निर्णय  आमचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आहे. त्यांनी अध्यक्ष बदलण्याचा भारतीय जनता पक्षाचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.