Sat, Jul 20, 2019 23:26होमपेज › Kolhapur › पदाधिकार्‍यांना पक्षप्रतोदांचा घरचा आहेर

पदाधिकार्‍यांना पक्षप्रतोदांचा घरचा आहेर

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 12 2018 1:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी

खोटी माहिती भरणार्‍या शिक्षकांवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. अशा शिक्षकांची यादी दाखविली जात नाही. या प्रकरणात काहीजण 50 हजार रुपये संबंधित शिक्षकांकडे मागू लागले आहेत. कर्मचार्‍यांकडूनही वर्गणी जमा करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेत असे गोळा करणारे खूप आहेत. असले धंदे बंद झाले पाहिजे. ते करण्याची जबाबदारी पदाधिकार्‍यांची आहे. मात्र, पदाधिकार्‍यांना काम करायचे नाही, असे दिसते. अशा शब्दात पक्षप्रतोद विजय भोजे यांनी मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकार्‍यांना घरचा आहेर दिला. अध्यक्षस्थानी जि. प.अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

भोजे म्हणाले, ऑनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती भरणार्‍या शिक्षकांवर काय कारवाई केली, या संदर्भात आपण माहिती मागितली होती. मात्र, ती मिळू शकली नाही. खोटी माहिती भरून या लबाड शिक्षकांनी आपली सोय करून घेतली. मात्र, त्यामुळे स्तनदा माता व गरोदर महिलांची मोठी गैरसोय झाली. खोटी माहिती भरणार्‍यांवर कारवाई करणे आवश्यक होते, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. कारण कारवाई होऊ नये म्हणून काही जण 50 हजार रुपये जमा करत होते. सभापती अंबरिश घाटगे यांनी चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांची यादी मागूनदेखील शिक्षण विभागाकडून मिळाली नाही, याचे काय गणित आहे ते समजू शकले नाही. चुकीची माहिती भरणार्‍या शिक्षकांवर जर कारवाई झाली नाही, तर या प्रकरणात आपण मंत्रालय पातळीपर्यंत दाद मागू. पंचायत राज समितीसमोर आपण उभे राहणार होतो, मात्र आपल्याच जिल्हा परिषदेची बदनामी नको म्हणून शांत बसलो. या कालावधीत कर्मचार्‍यांकडून कशासाठी सक्‍तीने वर्गणी वसूल करण्याचे काम सुरू आहे. यातील झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, हे शोधले पाहिजे. 

पाणी मर्यादा मानसी 70 लिटर

सध्या ग्रामीण भागात 40 लिटर प्रति मानसी गृहीत धरून पाणीपुरवठा योजना तयार केल्या जातात. यापुढे पाणीपुरवठा योजनांचा आराखडा माणसी 70 लिटरप्रमाणे करावा, असा ठराव अरुण इंगवले यांनी मांडला. 

जि.प. सदस्यांसाठी भवन बांधण्याचा ठराव

जिल्हा परिषदेच्या आवारात चंदगड भवनला जागा देण्याच्या विषयावर गरमागरम चर्चा झाली. मनोज फराकटे यांनी चंदगड भवनला कागलकर वाड्याऐवजी पदाधिकारी निवासस्थानाजवर बांधावी, अशी सूचना केली. यावरून चर्चेला सुरुवात झाली. यात कल्‍लाप्पा भोगम, सतीश पाटील, प्रसाद खोबरे, राहुल आवाडे, भगवान पाटील आदींनी भाग घेतला. या चर्चेतून जिल्हा परिषद सदस्यांसाठी भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

औषध घोटाळ्यातील आरोपींची सोयच

गाजलेल्या औषध घोटाळ्यातील दोषींवर काय कारवाई केली, असा प्रश्‍न मनोज फराकटे यांनी उपस्थित केला. यातील दोषींवर कारवाई करणे लांबच, त्यांची सोय प्रशासन करू लागला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विजय भोजे यांनी घोटाळ्यातील ताठ मानेने जिल्हा परिषदेत फिरत आहेत, त्यांना प्रथम बाहेर पाठवा, असे सांगितले. 

सरकार मान्य देशी दारूचे दुकानही असते

जिल्हा परिषदेची मालमत्ता खासगी संस्थांना देण्याचा विषय सभेपुढे होता. याला सभागृहात हरकत घेण्यात आली. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनी, संस्था सरकार मान्य असल्याचे सांगत असताना त्यांना थांबवत प्रसाद खोबरे यांनी, देशी दारू दुकानही सरकारमान्य असते, म्हणून जागा देता, असा सवाल केला.