Sat, Apr 20, 2019 16:16होमपेज › Kolhapur › पाणी योजनेवरून अधिकारी धारेवर

पाणी योजनेवरून अधिकारी धारेवर

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 13 2017 12:47AM

बुकमार्क करा

कोल्हापूर: प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील साजणी व कबनूर पेयजल योजनेत गैरकारभार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या उपअभियंत्यावर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांच्यावर सदस्यांनी केला. सदस्य प्रश्‍नांचा भडिमार करून धारेवर धरत असताना देसाई मात्र निरुत्तर झाल्याने अखेर सीईओंनी तातडीने कारवाईचे आश्‍वासन दिले. दरम्यान, निधी देण्यावरून अध्यक्षांनी शब्द पाळला नसल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांनी कारभारावर नाराजी व्यक्त केली. 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी एक वाजता शाहू सभागृहात शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सभेत सदस्यांनी शाळा दुरुस्ती, डॉक्टरांची अपुरी संख्या, रस्त्यांची दर्जोन्नती या विषयावरून वादळी चर्चा केली. कबनूर जलस्वराज्यचा विषय विजया पाटील यांनी तर साजणीचा विषय राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी उचलून धरला. दोन्ही योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न होऊनही उपअभियंत्यावर कारवाई का केली नाही असा सवाल केला. यावर देसाई यांनी गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांना आदेश दिल्याचे सांगितले. यावर निंबाळकर व पाटील यांनी मग अडलंय कुठे, तुम्हीच पाठीशी घालताय, तुम्हाला जुमानत नाही काय अशा शब्दात भडीमार सुरू केला. यावर देसाई निरुत्तर झाल्या. 

रस्ते व पाणी योजनांना निधीवरून विरोधी सदस्यांनी अध्यक्षांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. वंदना जाधव व बजरंग पाटील यांनी राधानगरी व गगनबावडा तालुक्यातील एकाही रस्त्याला आणि पाणी योजनेला मंजुरी का दिली नाही. काँग्रेसचे आहोत म्हणून निधी देत नाही का, असा सवाल केला. यावर अध्यक्ष महाडिक यांनी यात सुधारणा होईल, असे सांगितले. जि.प. शाळांचा दर्जा सुधारण्यावरून सदस्यांनी  चिंता व्यक्त केली. 

भोगलेंनी आता तरी निधी सोडावा

समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांची बदली झाल्याने त्यांचा सभागृहात सत्कार झाला. यावेळी सदस्यांनी भोगले यांना शुभेच्छा देतानाच आता आयुक्तपदावर गेल्यानंतर तर जि.प.साठी निधी देताना हात सैल सोडावा, अशी टिपणी केली.

परिपत्रकातून पदाधिकार्‍यांना वगळा

कर्मचार्‍यांनी अधिकारी, पदाधिकार्‍यांना भेटण्यासाठी परवानगी घ्यावी या  परिपत्रकावर सदस्यांनी हरकत घेत पदाधिकार्‍यांना वगळावे, अशी  केलेली मागणी सीईओंनी  मान्य केली. 

रस्ते काढून घेणार्‍या आमदारांना समज 

जि.प. कडील सर्व रस्ते काढून ते सार्वजनिक बांधकामकडे द्यावेत, अशी मागणी करून जि.प. च्या अस्तित्वावरच घाला घालणार्‍या आमदारांना समज द्यावी, असा ठराव सदस्य प्रवीण यादव यांनी मांडला.