Mon, Jul 15, 2019 23:39होमपेज › Kolhapur › पंढरीच्या वाटेवर आम्ही कोल्हापूरकर

पंढरीच्या वाटेवर आम्ही कोल्हापूरकर

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 11:21PMकोल्हापूर : प्रिया सरीकर

पंढरीचा महिमा, देतां आणिक उपमा
ऐसा ठाव नाही कोठे, देव उभाउभी भेटे...

माऊली भेटीची आस मनी बाळगून कोल्हापूर जिल्ह्यातून प्रतिवर्षी हजारो वारकरी पायीदिंडींतून आषाढी एकादशीला पंढरपूरला रवाना होतात. शतकोत्तर परंपरा कायम ठेवत याहीवर्षी जवळपास 80 हजारांहून अधिक वारकरी पायीदिंडींतून पंढरपूरला रवाना झाले आहेत. जिल्ह्यातून 250 च्या आसपास दिंड्या रवाना झाल्या आहेत. हाती पताका घेऊन, विठ्ठल दर्शनाच्या आशेने पिढ्यान्पिढ्या कोल्हापूर ते पंढरपूर पायी जाणार्‍या वारकर्‍यांची संख्या अधिक आहे. आता यामध्ये तरुणांचा सहभाग वाढला आहे. 

शहर व उपनगरांतून जवळपास शंभर दिंड्या रवाना होतात. प्रत्येक दिंडीत कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त दीडशे ते दोनशे वारकर्‍यांचा समावेश असतो. ग्रामीण भागातून निघणार्‍या पायी दिंड्यांची संख्या जवळपास दीडशेहून अधिक आहे. यावर्षी दि. 10 ते 15 जुलैदरम्यान बहुतांश दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या. शहरातून मोठ्या संख्येने वारकरी घेऊन जाणार्‍या व शतकी परंपरा असलेल्या अनेक दिंड्या आहेत. यामध्ये कुंभार मंडप, उत्तरेश्‍वर पेठ, शिवाजी पेठ, फुलेवाडी, दांडगाईवाडी येथील दिंड्यांची परंपरा मोठी आहे. कुंभार मंडपातील दिंडीने यावर्षी वारीची 127 वर्षे पूर्ण केली. अशा शतकी परंपरा लाभलेल्या अनेक दिंड्या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. ग्रामीण भागातही कसबा बावडा, बालिंगे, नागदेववाडी, गडहिंग्लज, शाहूवाडी परिसरातूनही जाणार्‍या दिंड्या आहेत. 

शहरात आषाढीचा रंग

सोमवारी आषाढी एकादशी साजरी होणार असली, तरी शनिवारीच शहरातील अनेक शाळा व बालमंदिरांतून लहानग्या वारकर्‍यांनी पायीदिंडी काढून आषाढीचा सण साजरा केला. या दिंडीमध्ये विठ्ठल- रखुमाईसह चिमुकले वारकरी सहभागी झाले होते. शहरात अनेक ठिकाणच्या शाळांमधून हे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे आज शहरात भक्‍तिमय वातावरण बनले होते. 

सर्वधर्मीयांची वारी...

कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार्‍या पायीदिंड्यांमध्ये सर्वधर्मीयांचा सहभाग असतो. शतकोत्तर परंपरा जपलेल्या कुंभार मंडपातील दिंडीतून तब्बल 80 वर्षे पंढरपूरची वारी करणार्‍या कै. नुरमहम्मद मलीकसोा पन्हाळकर यांचे आजही वारकर्‍यांना उदाहरण दिले जाते. जाती-धर्माचा कोणताही लवलेश न बाळगता पन्हाळकर यांनी वारीची परंपरा जोपासली होती. कुटुंबीयांनाही हेच संस्कार दिल्याने त्यांची पुढची पिढी समाजकार्यात सहभागी आहे. 

जिल्ह्यातून आषाढी वारीला जवळपास दीड लाखाहून अधिक भाविक पंढरपूरला येतात. पायीदिंडींतून येणार्‍यांची संख्या 80 हजारांहून अधिक आहे. वारकरी मंडळांकडून लहान दिंड्यांना सामावून घेतले जाते. जिल्ह्यातून येणार्‍या अनेक मोठ्या दिंड्यांत दीड ते दोन हजार वारकरी मार्गक्रमण करीत असतात.

-  ह.भ.प. भानुदास रामचंद्र यादव महाराज