होमपेज › Kolhapur › करू नैसर्गिक रंगांचीच उधळण (Video)

करू नैसर्गिक रंगांचीच उधळण (Video)

Published On: Mar 01 2018 9:13PM | Last Updated: Mar 01 2018 9:13PMनिलेश पोतदार, पुढारी ऑनलाईन 

कडक उन्हाळा आपल्‍यासोबत सुखावणारा वसंत ॠुतुही घेऊन येतो. वसंताच्या आगमनासोबतच सभोवतालच्या निसर्गातही होणाऱ्या बदलाची आपल्‍याला जाणीव होते. यावेळी झाडांच्या पानगळतीनंतर निसर्गाला एक नव्‍या पालवीनं नवं सौंदर्य लाभलेलं असतं. ते प्रत्येकाला मोहवणारं असतं. हा वसंतोत्‍सव माणसांप्रमाणं निसर्गातही मोठ्या उत्‍साहात साजरा होतो. या  निसर्गाच्या रंगोत्‍सवासोबतच रंगांची उधळण घेऊन येणारी रंगपंचमी म्‍हणजे रंगात रंगूनी रंग माझा वेगळा या सुरेश भटांच्या कवितेसारखीच असते. काळानुरूप या उत्‍सवाचं चित्र बदलत गेलंय, काही उत्‍सवातून मानवी जीवाला अपायकारक घटक मिसळू लागल्याने रंगपंचमीसारख्या सणालाही पर्यावरणपूरक रंगांचा आग्रह पर्यावरण प्रेमी धरू लागले आहेत. त्याला सर्वस्‍तरांतून मोठा पाठिंबाही मिळू लागलाय. 

निसर्ग मित्रचे पर्यावरणपूरक रंग....

पर्यावरणपूरक रंगांचे महत्‍व, रासायनीक रंगांचे धोके, त्‍याचे मानवी आरोग्‍यावर आणि निसर्गावर होणारे दुष्‍परिणाम याची जनजागृती करण्यासाठी कोल्‍हापुरातील निसर्गमित्र या संस्‍थेकडून गेल्‍या काही वर्षांपासून जनजागृतीचे काम केले जात आहे. यासाठी संस्‍थेने कृतीशील उपक्रम राबावायला सुरूवात केली. यासाठी पर्यावरणपूरक रंगांच्या निर्मितीसाठी संस्‍थेकडून निसर्गातील काही वनस्‍पती शोधण्यात आल्‍या आहेत. यासाठी ४२ वनस्‍पतींची निवड करण्यात आली. यामध्ये पळस, पांगारा, काटेसावर, झेंडू, जास्‍वंद, गलाटा, परिजातक, धायटी, पुदिना, शेंद्री, बेलफळ, कुंकुफळ, कोकम, बेहडा, हिरडा, अंजन, बाभूळ, हळद, डाळिंब, बीट, अर्जुन, कुंभा, मंजिष्‍टा, बिब्‍बा आदींचा समावेश आहे. या वनस्‍पतींपासून विविध रंग तयार करण्यासाठी आदर्श महिला बचत गटाचेही सहकार्य घेण्यात आले आहे. बचत गटाच्या माध्यमातून ९५० किलो पर्यावरणपूरक रंगांची निर्मिती करण्यात आली. 

या रंगांच्या निर्मितीची प्रकिया सोपी असून हे रंग कोरड्यास्‍वरूपात तसेच पाण्यात भिजवून अशा दोन्ही प्रकारे वापरता येतात. निसर्गमित्रकडून पर्यावरणपूरक रंगांची माहिती व्हावी यासाठी शाळा, महाविद्‍यालय, महिला बचत गटांमध्ये नैसर्गिक रंग बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. हे रंग पाना फुलांच्या माध्यमातून बनवता येत असल्‍याने घरच्या घरी बनवणे शक्‍य आहे. पर्यावरणप्रेमी संस्‍था, संघटनांसोबतच नागरिकांनीही पर्यावरणपुरक रंगानेच रंगपंचमी साजरी करावी. जेनेकरून रंगपंचमीची रंगत तर, वाढेलचं शिवाय पर्यावरणपूरक सण साजारा केल्‍याचं एक वेगळ समाधानही लाभेल.